प्रेम म्हणजे शस्र नव्हे! - तरुण मुलांशी पालकांनी कसं डील करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 07:00 AM2020-02-13T07:00:00+5:302020-02-13T07:00:06+5:30

तरुण मुलांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते न विचारता मुलांशी गप्पा मारा. त्यातून त्यांच्या जगाचा अंदाज येतो. त्यांचं जग फार गुंतागुंतीचं आणि तणावाचं आहे..

Love is not a weapon! - How should parents deal with young children? | प्रेम म्हणजे शस्र नव्हे! - तरुण मुलांशी पालकांनी कसं डील करायचं?

प्रेम म्हणजे शस्र नव्हे! - तरुण मुलांशी पालकांनी कसं डील करायचं?

Next
ठळक मुद्देआपणही आपल्या त्या वयात जमेल तशी बंडखोरी केलीच होती, याची आठवण ठेवलेली बरी. 

- मृण्मयी रानडे

लेक 18-19 वर्षाची होती, तेव्हाची गोष्ट. तिच्या मैत्रिणीला एका मित्रासोबत कोणीतरी पाहिलं आणि तिच्या आई-वडिलांना कळवलं. आईने फोन करून तातडीने तिला घरी बोलावून घेतलं आणि आठ दिवसांसाठी बाहेर जाणं बंद केलं. कॉलेज नाही, क्लाससुद्धा नाही. एक दिवस तिच्या आईने माझ्या लेकीलाही बोलावलं आणि झाडझाड झाडलं. कारण ती सगळ्यात जवळची मैत्रीण. तिच्यावर जबाबदारी, तिनेच बिघडवलं, वगैरे वगैरे. हे सगळं लेक आम्हा दोघांना सांगत होती. आणि म्हणाली ‘आय हॅव अ बॉयफ्रेंड टू, होप यू डोण्ट हॅव अ प्रॉब्लेम!’ असं म्हणण्यातला तिचा आवेश अर्थातच खटकला मला; पण तिला तेव्हा इतकंच सांगितलं की,  सध्या अभ्यासाला पहिलं प्राधान्य द्यायचं. बॉयफ्रेंडला किती वेळ द्यायचा, किती मानसिक/भावनिक गुंतायचं, त्याचा अभ्यासावर परिणाम होता कामा नये. इतकी काळजी घ्यायलाच हवीस तू. त्यावर हो हो, तितकी अक्कल आहे मला, असं म्हणून झालं. विषय संपला- तात्पुरता.
मी तिच्या वयाची होते तेव्हा मला बॉयफ्रेंड वगैरे नव्हता. मी प्रेमात मात्र अनेकदा पडले होते. माझ्याही प्रेमात काही वीर होते; पण मला त्यांच्यात रस नाही हे स्पष्ट सांगितल्यावर ते मुकाट मागे फिरले होते. (मी ज्यांच्या प्रेमात पडले होते त्यांना मी काही सांगायच्याही फंदात पडले नव्हते.) हे प्रेमवीर मागे फिरल्याने तेव्हा हुश्श वाटलंच होतं; पण त्याचा फार विचार केला नव्हता. सांगलीतलं अमृता देशपांडे प्रकरण याच सुमाराचं होतं, तरीही अशी सूड घेण्याची भीती वगैरे वाटली नव्हती, हे नक्की.
मग गेल्या 30 वर्षात काय बदललंय? बदललंय का काही? प्रेम तर तेच आहे, असायला हवं. आपण बदलतोय का? हो, आपण बदललोय, बदलतोय. किंबहुना  बदलायला हवंय. 30 वर्षापूर्वीचे टीनएजर आणि आजचे टीनएजर वेगळे आहेत. त्यांची सामाजिक-कौटुंबिक, मानसिक-शैक्षणिक विश्व वेगळी आहेत. मग  पालकांनी तरी 1970-80 च्या दशकात राहून कसं चालेल? आपणही काळाच्या गतीने बदलायला, सुधारायला हवंच. 
पण म्हणजे काय करायचं?
मुलांच्या या वयात पिअर प्रेशर काय असतं हे काही नव्याने सांगायला नको. आपणही आपल्या त्या वयात जमेल तशी बंडखोरी केलीच होती, याची आठवण ठेवलेली बरी. 
पण..
सध्या आजूबाजूला काय दिसतंय, ते लक्षात घेऊन आपण काही पावलं उचलू शकतो. 


1. पहिलं म्हणजे मुलांशी बोलणं. या वयातल्या मुलांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. त्यांच्याकडून खुशीने उत्तरं काढून घ्यावी लागतात. दिवस कसा होता, बस/ गाडी/ रिक्षा मिळाली का, कोण होतं सोबत येता-जाता, पैसे आहेत ना पुरेसे जवळ, या गोष्टी रोज बोलायलाच हव्यात. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना चहा-कॉफीच्या निमित्ताने आवजरून घरी बोलवा, त्यातल्या काहीजणांचे मोबाइल नंबर्स स्वतर्‍जवळ ठेवा. त्यांचे आई-वडील काय करतात, हे विचारा. आणि मुलांशी त्यांच्या जगाविषयी मस्त गप्पा मारा.
2. सततचा संवाद असला, संभाषण असलं की मुलांवर असलेले ताण लक्षात येतात. आपल्या वाटय़ाला आले नव्हते इतके तणावपूर्ण प्रसंग आजच्या मुलांवर येतात हे लक्षात घ्यायला हवं. चांगले मार्क, अ‍ॅडमिशन, नोकरी, घर, लग्न यांचा ताण आता अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आपल्यापैकी अनेकांची लग्न मोडत आहेत, वैवाहिक संबंध तणावाचे आहेत, हे आजची पिढी अधिक डोळसपणे बघते आहे, त्यावर सवाल करते आहे, विचार करते आहे, याचा त्यांच्या लगAाविषयीच्या विचारांवर नक्कीच परिणाम होतो आहे.
3. पूर्वीच्या पिढय़ा पडत तशी आजची मुलं ही प्रेमात पडतात; पण टीव्ही, इंटरनेट, गुगल आणि त्यांच्या शरीराचा एक अवयव बनलेला मोबाइल यामुळे प्रेम म्हणजे काय याबाबतचं त्यांचं आकलन गंडलेलं आहे. प्रेम म्हणजे मालकी, प्रेम म्हणजे सेक्स, प्रेम म्हणजे शरणागती, प्रेम म्हणजे हक्क गाजवणं हा अर्थ आजच्या मुलांना जवळचा वाटू लागला आहे. हिंदी-मराठी चित्रपटामधल्या याच वृत्तीच्या नायकांनी या विचाराला खतपाणी घातलंय. जुने आपल्याला अतिशय आवडलेले चित्रपट आठवा. त्यातही हेच होतं; पण ते फक्त पडद्यावर घडताना दिसे.
 आज नेटफ्लिक्स/ अ‍ॅमेझॉनवर मालिकांचं बिंजण होतं. सलग काही तास प्रेक्षक मुलं त्याच जगात वावरतात. खेरीच हे चित्रण नको इतकं ‘वास्तवदर्शी’ असतं. आपण पाहत होतो तो पडद्यावरच घडू शकणारा चित्रपट होता. 
4. दुसरीकडे अर्थकारण या मुलांच्या जीवनावर परिणाम करतं. नोकरी मिळणं कठीण झालंय, व्यवसाय करावा तर तोही सोपा नाही. ढोर मेहनत करायची सवय नाही, कारण आपण पालकांनी त्यांना अनेक गोष्टी सोप्या करून ठेवल्या आहेत. मुली शिकायला लागल्या त्याला अनेक दशकं उलटली, पण ज्या संख्येने आज मुली कॉलेजांमधून बाहेर पडतायत ती प्रचंड आहे. या मुलींमध्ये प्रचंड भूक आहे. महत्त्वाकांक्षा आहे. लगA-मूल-संसाराला त्या प्राधान्य देत नाहीत. आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्या कष्ट घ्यायला तयार आहेत. हे मुलांच्या पचनी पडत नाहीये हे वास्तव आहे. 
5. या सार्‍याविषयी आपण मुलांशी गप्पा मारतो, बोलतो तेव्हा त्यांची यावरची मत कळतात. मुलींकडे आपला मुलगा कोणत्या दृष्टीने पाहतोय, हे नक्की कळून येतं. तो नोकरीच्या संधीबद्दल बोलतो तेव्हाही मुलींचा उल्लेख कसा करतो, याकडे लक्ष दिलं तर अंदाज येईल. काही गडबड वाटली तर त्याच्याशी बोलावं. घरातल्या एखाद्या मोठय़ा व्यक्तीला तो जवळचा असेल, तिच्याशी बोलणं करून द्यावं. त्याच्या मित्र-मैत्रिणींशी बोलून कानोसा घ्यावा.
6. प्रेमात पडणं चुकीच नाही; पण ज्या व्यक्तीच्या प्रेमात आपण पडलो आहोत तिनेही आपल्या प्रेमात पडलंच पाहिजे, ही अपेक्षा नक्की चुकीची आहे. ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही, आपुलकी नाही ती आपल्याबरोबर किंवा आपण तिच्याबरोबर आनंदी राहू शकत नाही, याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. 
7. नव्या पिढीला दोष देणं सोपं आहे, आमच्यावेळी असं नव्हतं, असं रेटून म्हणणं सोपं आहे. पण एका मोठय़ा स्थित्यंतरातून जात असलेल्या पिढीला समजून घेणं कठीण असलं तरी अशक्य नाही. मुलांवर प्रेम करायला कोणत्याच आईबापाला शिकवणी लावावी लागत नाही की कोणी आदर्श समोर ठेवावे लागत नाहीत. फक्त या प्रेमाचा वापर शस्र म्हणून उपयोग करू नये. आपल्या प्रेमामुळे मुलं सरळ होतील, त्यांची गाडी रुळावर येईल, वगैरे फाजील आत्मविश्वासही नको. प्रकरण आपल्या  आवाक्याबाहेर चाललंय असं वाटलं तर सरळ व्यावसायिक मदत घ्यावी. आपण पालक आहोत, सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान नाही. मुलांच्या भावविश्वात काय उलथापालथी होताहेत ते उमगणंही मोलाचं आहे. कान, डोळे, नाक उघडे ठेवून ‘विनाअट’ प्रेम करत राहाणं तर आपल्या सर्वाना जमेलच. जमवूच!

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Love is not a weapon! - How should parents deal with young children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.