Lokmat Oxygen- First time voters survey 2019 - first time Voters, what they expect from leadership? | तुमच्या राजकीय नेतृत्वाकडून तुमची सगळ्यात ‘पहिली’ अपेक्षा (प्रायॉरिटी) कोणती?
तुमच्या राजकीय नेतृत्वाकडून तुमची सगळ्यात ‘पहिली’ अपेक्षा (प्रायॉरिटी) कोणती?

ठळक मुद्देउत्तम शिक्षण हवं आणि हाताला काम.

-ऑक्सिजन  टीम 

सोशल मीडियातून ‘लॉग आउट’ व्हा, तुम्हाला खरा भारत भेटेल असं हल्ली जाणकार सांगतात ते खरंच आहे. समाज माध्यमात केवढा तो जातींचा विखार, धर्मद्वेषाचं जहर, त्यावरचे वितंडवाद.
‘लोकमत ऑक्सिजन’ने प्रत्यक्ष तरुण मुलामुलींची गाठ घेतली तेव्हा मात्र भेटलं सुज्ञ तारुण्य. ज्यांना भवतालाचं भान आहे, आणि खोटय़ा चर्चाचे फुगे आपल्या कामाचे नाहीत याची जाणही आहे. म्हणून तर 60 टक्के तरुण-तरुणी म्हणतात की, बाकी जाऊ द्या आमचं नेतृत्व करू म्हणणारे आमच्या शिक्षणाचं आणि रोजगाराचं काय करणार ते सांगा !
कालबाह्य शिक्षण, हाताला नसलेलं स्किल, लांबवर न दिसणार्‍या नोकर्‍या आणि उत्तम आयुष्य जगण्याची नाकारली जाणारी संधी हे सारं तरुण मुलामुलींना जास्त त्रासदायक वाटतं. म्हणून तर ते म्हणतात की धार्मिक-जातीय रक्षण आणि अस्मिता यांचं काय करायचं ते नंतर पाहू, आधी आम्हाला शिक्षण आणि रोजगार द्या.
त्या खालोखाल आहेत, नागरी सुविधांच्या कळीचा प्रश्न. रोजच्या जगण्यातल्या अडचणी सोडवण्याच्या अपेक्षा. त्यातही तरुणांपेक्षा तरुणींना हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतं. साधी एसटीची सोय नाही म्हणून शिक्षण सुटतं, स्वच्छतागृह नाहीत म्हणून आरोग्यावर परिणाम होतो इथपासून मुलींचे प्रश्न सुरू होतात आणि रोज डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहताना शिक्षण आणि उत्तम संधी नाकारल्या जातात. हे सारे कष्ट कमी व्हावेत म्हणून मुली सांगतात की, नागरी सुविधांचा विकास करा, ती आमची टॉप प्रायॉरिटी आहे. 
‘टॉप प्रायॉरिटी’ हा तरुण मुलांच्या आयुष्यात फार महत्त्वाचा शब्द असतो. जी प्रायॉरिटी नाही, त्याला त्यांच्या लेखी इम्पॉर्टन्सही नसतो.
आणि म्हणूनच जातधर्माचा खल सोशल मीडियात करणार्‍यांपेक्षाही हे जमिनीवर जगणारं तारुण्य वास्तवाच्या अधिक जवळ असतं.
त्या वास्तवाची एक झलक म्हणजे ही आकडेवारी !

***

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* नागरी सुविधांचा विकास - 26.32 %
* शिक्षण आणि रोजगार - 61.67 %
* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचे रक्षण - 6.94 %
* यापैकी नाही : 2.06 %
एकूण सहभागींपैकी 3}  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.
--------------------------------------------------------

मुली म्हणतात 
* नागरी सुविधांचा विकास - 27.61%
* शिक्षण आणि रोजगार - 61.74 %
* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचे रक्षण - 6.87 %
* यापैकी नाही - 2.09 %
 शिक्षण आणि रोजगार हीच ‘प्रायॉरिटी’ असण्यावर मुला-मुलींचं ठामठोक एकमत आहे.
मुलींना नागरी सुविधांची कळकळ मुलांपेक्षा किंचित अधिक दिसते आणि ते स्वाभाविकही आहे.
 
 -----------------------------------------------
मुलगे म्हणतात 
* नागरी सुविधांचा विकास - 24.95 %
* शिक्षण आणि रोजगार - 61.61 %
* धार्मिक-जातीय स्वाभिमानाचं रक्षण - 7 %
* यापैकी नाही - 2.01 %
यापैकी नाही असा पर्याय निवडणार्‍या काही मुला-मुलींनी आपल्या राजकीय नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांची लांबलचक यादीच प्रश्नावलीसोबत पाठवलेली दिसते. त्यात सतत पक्ष न बदलण्यापासून ते भ्रष्टाचारापासून दूर राहण्यार्पयत अनेक गोष्टींना ‘प्राथमिकता’ दिलेली आहे. आणि अपेक्षांचं ते काहीच करत नाही असा टीकेचा कठोर सूरही लावला आहे. 

***
 

2009 - ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स -  दहा वर्षात नेमकं काय बदललं?


प्रश्न जैसे-थेच ! - बदल शून्य!

* स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, तरी तीच चर्चा सुरू आहे. 2009 साली 15व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही बिजली सडक पानी याच मुद्दय़ांची चर्चा निवडणुकीत होती. आणि तेव्हा सव्र्हेत सहभागी झालेल्या तरुण मुलांनाही  शिक्षण आणि रोजगार या दोनच गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. 
* 45 टक्के तरुण तेव्हा सांगत होते की, बाकी सगळं सोडा आमच्या शिक्षणाचं आणि हाताला काम देण्याचं काय कराल ते सांगा. 
* आज 17व्या लोकसभेची निवडणूक आणि आजही 60 टक्के तरुण तेच म्हणत आहेत. हाताला काम आणि स्किल देणारं शिक्षण, या अपेक्षा 10 वर्षानंतरही त्याच असतील तर हे चित्र काय सांगतं?


Web Title: Lokmat Oxygen- First time voters survey 2019 - first time Voters, what they expect from leadership?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.