मगर कोई ब्रेन भी पढा है? - आता मेंदू वाचता येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 02:20 PM2020-09-03T14:20:31+5:302020-09-03T14:21:22+5:30

मेंदूच्या आत काय घडामोड चालली आहे, त्याचं नक्की काय बिनसतं, काय मस्त जमतं हे सारं बाहेरून वाचता आलं तर? -आता तेही फार लांब नाही!

a live Neuralink brain-chip device | मगर कोई ब्रेन भी पढा है? - आता मेंदू वाचता येणार!

मगर कोई ब्रेन भी पढा है? - आता मेंदू वाचता येणार!

Next
ठळक मुद्देभविष्यात मेंदू संशोधन वेग घेईल, अशी चिन्हे आहेत.

- प्रसाद ताम्हनकर

मानवी मेंदू आणि त्याचं कार्य हा विषय कायमच जगभरातील शास्रज्ञांना खुणावत राहिला आहे.
आजही मानवी मेंदूचा किंवा त्याच्या कार्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला करता आलेला नाही, असे जगभरातील अनेक शास्रज्ञ मानतात. 
या विषयावरती आजही संशोधन सुरूच आहे.
आजचा आघाडीचा आणि धडाडीचा शास्रज्ञ, जगभरातील तरुणाई ज्याला आदराने ‘आयर्न मॅन’ म्हणते, तो एलन मस्कदेखील या मानवी मेंदूच्या अभ्यासासाठी झपाटलेला आहे. शास्नच्या विविध शाखांमध्ये यशस्वी संशोधन करण्यासाठी नावाजलेल्या एलन मस्कने खास मानवी मेंदूचे वाचन करण्याच्या संशोधनासाठी 2016मध्ये न्यूरालिंक या कंपनीची स्थापना केली आहे. 
‘कोणत्याही वायरची मदत न घेता मानवी मेंदूचे वाचन करणं’ हे या कंपनीच्या प्रमुख संशोधनामागचे उद्दिष्ट आहे. न्यूरालिंकने आपल्या या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचत, मेंदूत बसवता येण्याजोगी एक छोटीशी चिप विकसित केली आहे. नुकताच तीन डुकरांवरती हा प्रयोग करण्यात आला. तब्बल दोन महिने ही चिप या डुकरांच्या मेंदूत कार्यरत होती. या तीन डुकरांपैकी गॅटर्ड नावाच्या डुकराने या अभ्यासात खूप साहाय्य केल्याचे शास्रज्ञांनी सांगितले. डुकरांना चिप बसवल्यानंतर खाणे देण्यात आले, आणि पहिल्यांदाच त्यांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीला लाइव्ह पाहता आलं. 


कंपनीने दाखवलेल्या प्रेझेंटेशनुसार आजवर विविध अशा 19 प्रजातींवरती या चिपचा उपयोग करून बघण्यात आला आहे आणि त्यात शास्रज्ञांना 87 टक्के यश मिळवता आलेले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त फायदा, हा अल्झमायरच्या रुग्णांवरील उपचारासाठी होणार आहे. या प्रयोगानंतर न्यूरालिंकचा सर्वेसर्वा असलेल्या एलन मस्कने एक वेबकास्ट प्रसिद्ध केलं. त्यात मस्कने एक इम्प्लान्टेबल डिव्हाईस प्रत्यक्षात स्मृती नष्ट होणे, श्रवणशक्ती कमी होणे, औदासीन्य आणि निद्रानाश अशा समस्या सोडवू शकते’, असा दावा केला आहे. या चिपचा आकार अत्यंत लहान म्हणजे केवळ आठ मिलिमीटर इतकाच आहे.
 विशेष म्हणजे मागच्या जुलै महिन्यातच न्यूरालिंकच्या संशोधकाने ते एका खास ब्रेन चिपवरती काम करत असल्याचे सांगितले होते. ही चिप हेडफोनची गरजच संपवून टाकणार आहे. ही चिप मेंदूत बसवल्यावरती, तिच्या मदतीने मनुष्य सहजपणे संगीत ऐकू शकेल आणि विविध अ‍ॅप्सवरती स्ट्रिम देखील करू शकेल.
भविष्यात मेंदू संशोधन वेग घेईल, अशी चिन्हे आहेत.



(प्रसाद विज्ञान/तंत्रज्ञानविषयक लेखकआहे.)
 

Web Title: a live Neuralink brain-chip device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.