डॉ. गौरी करंदीकर (स्त्रीरोग तज्ञ) -
तरुण मुलामुलींची लाईफस्टाईल, जंकफूड खाण्याचे प्रमाण, व्यायामाचा अभाव, सतत टीन किंवा प्रोसेस्ड फुड खाण्याचे वाढते प्रमाण आणि एकूणच तब्येतीकडे ऐन तारुण्यात दुर्लक्ष करायला लावणारी धावपळ. यामुळे फक्त व्हिटॅमिन डीच नाहीतर अनेक प्रकारच्या डेफिशियन्सी अर्थात कमतरता अनेक मुलामुलींमध्ये दिसतात. त्यातून अनेक शारीरिक प्रश्नही निर्माण होतात. विशेषत: मुलींमध्ये. ऐन तारुण्यात योग्य पोषण न झाल्यानं त्यांना अनेक गुंतागुतीच्या आजारांना सामोरं जावं लागतं.
आजच्या घडीला अशा चार महत्त्वाच्या कमतरता प्रकर्षाने जाणवतात.
आयर्न अर्थात लोहाची मात्र रक्तात कमी
हल्ली जो तो ऊठसुट म्हणतो, माझं एचबी कमी आहे यार. त्यालाच म्हणतात आयर्न डेफिशियन्सी. अर्थात रक्तात लोह कमी असणं. अनेकजणांना आयर्न कमी असल्यामुळेच अनेक त्रस जाणवतात.
त्रस काय होतो?
सतत थकवा जाणवतो.
अशक्तपणा येतो.
सतत आणि पटकन फटीग येतो. उत्साह कमी होतो.
कशात लक्ष लागत नाही.
चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं.
आयर्न खूपच कमी असेल तर हातापायांवर सूज येते.
काहीजणांना चक्कर येते.
आणि काही घटनांमध्ये तर हृदय आणि मूत्रशयावरही परिणाम होऊ शकतो.
‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता
मजबूत हाडांसाठी शरीराला जसं कॅल्शियम जरुरीचे असतं तसंच व्हिटॅमिन डी. या महत्त्वाच्या व्हिटॅमिनशिवाय शरीरात कॅल्शियम वापरलेच जाऊ शकत नाही.
त्यामुळे कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी हाडांच्या बळकटीसाठी खूप महत्त्वाचे ठरते. हाडांची घनता त्यातून ठरते. मुख्य म्हणजे तरुण मुलींच्या संदर्भात व्हिटॅमिन डी हे एकप्रकारच्या हार्मोनचं काम करते. मुलींची पुनरुत्पादन संस्था उत्तम काम करण्यासाठी या व्हिटॅमिनची खूप गरज असते. ते कमी पडले की, अनेक प्रश्न निर्माण होतात.
त्रस काय होतो?
अनेक मुलींना वजन वाढ, पीसीओडी, मासिक पाळीत अनियमितता, असे प्रश्न जाणवतात. भविष्यात गरोदरपणासंदर्भात काही समस्या, गर्भधारणोत येणा:या अडचणी, बाळाचे जन्मत: वजन कमी असणं, हाडांचा ठिसूळपणा, सांधेदुखी अशा अनेक समस्या जाणवू शकतात.
कॅल्शियमची कमतरता
अनेक तरुण मुलामुलींमध्ये हाडांची घनता कमी असणं, ठिसूळपणा हे आजार तरुणपणात दिसून येतात, त्याचं कारण कॅल्शियमची कमतरता. त्याला जोडून शरीराला व्हिटॅमिन डी कमी मिळणं. त्यातून दातांचे, हाडांचे विकार, लवकर फ्रॅर होण्यासारखे आजार चटकन होतात.
बी 12 आणि व्हिटॅमिन ए
आपल्याकडे बहुतांश मुलामुलींमध्ये बी 12ची कमतरता दिसते. त्यातूनही थकवा, फटीग असे आजार दिसतात. तर अनेकांना चष्मा लागतो, डोळे अधू, दृष्टीविकार सुरू होतात त्याचं कारण व्हिटॅमिन ए ची कमतरता.
ऐन तारुण्यात शरीर असं पोखरायला लागतं.
-------------------------------
पोषण'कमी’
कशामुळे?ह्या प्रश्नाचं उत्तरं म्हणून दोनच कारणं सांगता येतील. एक म्हणजे आपला आहार आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल.
तिथेच सारं चुकतं. आणि त्यातून शरीराचं पोषण कमी होतं.
चुकतं काय?
1) पोषण आहारच न मिळणं. मात्र याचा संबंध आर्थिक स्थितीशी नाही. घरात पोटभर जेवायला मिळत असूनही ‘बाहेरचं’ खाण्याशी आहे. सतत हॉटेलात काहीतरी ‘जंक’ खायचं. प्रोसेस्ड आणि टीन फुड खायचं यातून शरीराचं पोषण होत नाही. ज्या पदार्थातले व्हिटॅमिन नष्ट झालेले आहे, तेच आपण खातो.
2) आपल्या अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती. अतिशिजवलेलं खाणं.
3) कच्चं खाणं कमीच. आपण ते विसरतच चाललो आहोत. कोशिंबिरी खाणंच बंद झालंय अनेकांचं.
4) कुरकुरेंपासून वडापावर्पयत रोज अत्यंत निकृष्ट खाणं पोटात जातं.
5) व्यायामाचा अभाव. सूर्यप्रकाशाचा स्पर्शच नाही. शरीरातून घामच येत नाही.
करायचं काय?
1) रोज घरी चारीठाव जेवा. समतोल आहार घ्या.
2) हंगामी फळं, भाज्या, पोटभर खा.
3) बाहेरचं खाणं, हॉटेलातलं जेवण, प्रिझर्वेटिव्हज घातलेलं अन्न खाणं कमी, जमल्यास बंद करा. तेलकट, तळकट, थंड कमी खा.
4) व्यायाम करा. उन्हात जा.
5) तब्येत बरी नाही असं वाटलं तर डॉक्टरांना भेटा.