शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

देवेंद्र...भालाफेकीत त्याचा एकुलता एक हातही कुणी धरू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 07:11 IST

वयाच्या आठव्या वर्षी शॉक लागून त्याला डावा हात गमवावा लागला. हात गेला, पण मनातली उमेद, जिंकण्याची ईर्ष्या हे सारं कुठलाच शॉक जाळून टाकू शकत नाही. उलट त्याच्या मनातली आग अशी काही भडभडून पेटली की त्यानं ठरवलं, जिंकायचंच! आणि तो जिंकलाच! दोन पॅराआॅलिम्पिक सुवर्णपदकं आणि बरंच काही..

-चिन्मय लेले

भालाफेकीत त्याचा एकुलता एक हातही कुणी धरू शकत नाही. त्यानं केलेली कमालही कुणाला करता येणं अवघड. कारण २००४ च्या अ‍ॅथेन्स पॅरा आॅलिम्पिकमध्ये भालाफेकीचं रेकॉर्ड करत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. आणि २०१६ पर्यंत ते रेकॉर्ड तसंच होतं. २०१६ मध्ये त्यानं स्वत:चंच रेकॉर्ड तोडलं आणि पुन्हा एकदा देशासाठी सुवर्णपदक जिंकलं.दोन पॅराआॅलिम्पिक सुवर्णपदकांची कमाई देशाला करून देणाºया या गुणवान खेळाडूचं नाव आहे देवेंद्र झाझडिया. यंदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी त्याचं नाव जेव्हा पुढे सरकलं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. देवेंद्रला पुरस्कार देण्याची शिफारस केली गेली याचा तो धक्का नव्हता तर देशात अनेक हट्टेकट्टे कर्तबगार खेळाडू असताना एका दिव्यांग खेळाडूला, पॅराअ‍ॅथलिटला हा पुरस्कार देण्याची शिफारस सरकारनं करणं हा एक मोठा धक्का होता. तो पुरस्कार मिळवणारा देवेंद्र देशातला पहिला पॅराअ‍ॅथलिट ठरला, हा आणखी एक धक्का.पण लोकांच्या मानसिकतेला धक्के देत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करणं हे काही त्याच्यासाठी नवीन नाही. वयाच्या आठव्या वर्षापासून तो हेच करत आला आहे.राजस्थानातील चुरू जिल्ह्यातल्या छोट्याशा गावचा हा मुलगा. आठ वर्षांचा होता. झाडावर चढताना त्याला इलेक्ट्रिकचा शॉक लागला. त्यातून जीव वाचवण्यासाठी त्याचा डावा हात कापून टाकावा लागला. शाळेत जात होता. खेळात रस होता; पण एक हात नसलेल्या मुलाला कोण खेळात घेणार? देवेंद्र सांगतो, ‘ मला आठवतं सुदृढ मुलांसोबत मी खेळायचो तेव्हा सगळे म्हणायचे, कशाला वेळ वाया घालवतोस, काही पोटापाण्याचं बघ. पण एका हातानं पोटापाण्याचं तरी मी काय बघणार होतो? खेळात रस होता, खेळताना साºया वेदना, मानअपमान मागे पडायचे. म्हणून मी खेळत राहिलो. शालेय, राज्य स्तरावर खेळलो. गोळाफेकही करायचो.’त्यातून त्याला रेल्वेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीही मिळाली. पोटापाण्याची सोय झाली; पण खेळण्याची इच्छा होती. भालाफेक एका हातानं का होईना सुरू होती. स्पर्धेला जायचं कुठं तर पैसा नव्हताच. त्यात त्यानं कितीदा कंपन्यांना, कार्पोरेट हाउसेसना, सरकारला मदतीसाठी पत्रं लिहिली, पण काही सोय होत नव्हती. रेल्वेचा कर्मचारी म्हणून होत होती तेवढीच मदत आणि रेल्वेनं पुरवलेल्या सुविधांवर काम सुरू होतं. तरीही २००२ च्या साऊथ कोरियामधल्या दिव्यांगांच्या स्पर्धेत त्यानं भाग घेतला. तिथं सुवर्णपदक जिंकलं. आणि प्रशिक्षक रिपूदमन सिंग यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं, त्यांनी त्याला प्रशिक्षण देणं सुरू केलं. आणि त्यानं २००४ च्या अथेन्स पॅराआॅलिम्पिकपर्यंत धडक मारली.देवेंद्र सांगतो, मी अथेन्सला गेलो तेव्हा मला कुणी ओळखतही नव्हतं. कुणाच्या काही अपेक्षा असण्याचं तर कारणच नाही. माझी आई मात्र मला कायम पाठिंबा देत आली. तिनं माझ्या स्वप्नांना, मेहनतीला कधी कमी लेखलं नाही. मी अथेन्सला गेलो, रेकॉर्ड केलं, गोल्ड जिंकलो. परत आल्यावर कौतुक झालं. मला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीही मिळाले. त्यानं हुरुप वाढला. देशासाठी आपण खेळतोय, आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय ही भावना तुम्हाला सतत ताकद देते. मार्ग शोधायला भाग पाडते. ती अडचणी सांगत नाही, तर प्रश्न सुटतील कसे याचा विचार करते. माझ्या महत्त्वाकांक्षेला बळ दिलं, काहीतरी मोठं करण्याची मनातली आग शाबूत ठेवली ती या भावनेनेच!’या साºयात कुणीतरी त्याला विचारतंच की, झाडावर चढून हात गमावल्याचं दु:ख अजूनही वाटत असेल ना?तो म्हणतो, ‘ मी आता असं नाही बघत त्या घटनेकडे. माझ्या घरच्यांनी आणि माझ्या प्रशिक्षकांनी मला त्याच घटनेकडे वेगळ्या नजरेनं पहायला शिकवलं आहे. एक हात गमावून मी जर एवढं सारं कमावलं असेल तर त्या हाताचं दु:ख करण्याचं काय कारण? काय वाईट झालं याचा विचार मी करत बसत नाही, काय कमावलं, काय करता आलं असा विचार केला की पुढं जायची ताकद मिळते.तसंही अडचणी कुणाला नसतात? प्रत्येकाला कुठली ना कुठली अडचण असतेच. मी ज्यांना आदर्श मानतो, ते मिल्खा सिंग. पळताना त्यांच्या पायी चांगले बूटही नव्हते. मी दिव्यांग खेळाडूंना नाही तर इतरांना आणि स्वत:लाही हेच सांगतो की, जर आपण ठरवलं की जिंकायचंच तर मग आपल्याला कुणी अडवू शकत नाही. आपली वाट कुणी रोखून धरत नाही. पण आपणच ठरवलं की, मला नाही जमणार, फार अवघड आहे तर मग नाहीच जमत आपल्याला ते! आपण जिंकायचं की हरायचं हे आपणच ठरवायचं असतं!’हे देवेंद्र सांगू शकतो कारण २००४ नंतर २०१६ साली म्हणजे तब्बल १२ वर्षांनी जेव्हा तो पुन्हा पॅराआॅलिम्पिकला गेला तेव्हाही अनेकांना वाटत होतं की, वय वाढलं आहे आता यावेळी गोल्डची कामगिरी काही हा करत नाही; पण त्यानं साºयांना चुकीचं ठरवलं आणि आपलंच रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्डही बनवलं. त्याचा स्वत:वर आणि स्वत:च्या भाल्यावर, त्याच्या अचूक वेगावरही विश्वास होताच.तो सांगतो, ‘ पॅराआॅलिम्पिकला गेलो तेव्हा तिथल्या टेबल टेनिस खेळाडूंबरोबर मी टेबल टेनिस खेळायचो. त्यांच्याशी दोस्तीच झाली. अजूनही ती दोस्ती जिवंत आहे. असे दोस्तही तुम्हाला प्रेरणा देतात, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे दोस्ती कुणाशी हा देखील आपणच ठरवायचा मुद्दा असतोच. मला एकच कळतं, लोक आपल्यावर टीका करतात, आपल्याला हसतात तेव्हा त्यांना उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं काम चोख करावं. आपलं कामच एकदिवस त्यांना आपल्यापाशी आणतं. आपल्याला तीच माणसं मग सपोर्ट करतात, आपलं कौतुक करतात. आपण मात्र मेहनत घ्यायची ती आपल्यावर, इतरांसाठी जे सिद्ध करायचं ते आपोआप होतंच.!’वयाच्या २१ व्या वर्षापासून देवेंद्र सतत लहानमोठी पदकं जिंकतो आहे. त्यात दोन पॅराआॅलिम्पिक मेडल्स आणि आशियाई, जागतिक तर कितीतरी मेडल्स आहेत. पण त्या साºयावर कळस चढवला तो यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांनी.देवेंद्र सांगतो, हा पुरस्कार मला हुरुप देईल का, तर देईलच! पण या देशात ५ कोटी पॅराअ‍ॅथलिट आहेत, दिव्यांग खेळाडू आहेत, जे शरीरानं अधू असले तरी खेळावर त्यांचं नितांत प्रेम आहे, त्या साºयांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. आणि हा पुरस्कार भेदाभेदाच्या भिंती पुसून खेळाडूंकडे खेळाडू म्हणून पाहीन, खेळाडूंना त्यांचे हक्क मिळतील अशी मला आशा वाटते.’त्याची आशा खरी ठरोच! आणि खेळाडूंमधले भेदाभेद कमी होऊन खेळभावनेचा गौरव व्हावा हे जास्त महत्त्वाचं.केवळ खेळाच्या भावनेलाच नाही जगण्याच्या, झगडण्याच्या भावनेलाही बळ देणारी कामगिरी आहे या खेळाडूची!त्याचे विचार, त्याचा झगडा पाहिला की तो म्हणतो त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो की, आपण ठरवलं जिंकायचंच की आपण जिंकतोच!- ठरवायला फक्त हवं!

( चिन्मय मुक्त पत्रकार आहे.)