अनिल भापकर
फोन विकत घेताना प्रोसेसर चेक करताय ना?
एक काळ असा होता की, तुमच्या मोबाइलला किती मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे, याला महत्त्व होते. त्यानंतर काळ आला तो स्क्रीन साईजचा. म्हणजे जेवढा जास्त मोठा स्क्रीन साईज तेवढे चांगले. आता मात्र मोबाइलचा कोअर प्रोसेसर जेवढा चांगला तेवढा स्मार्टफोन चांगला, असा एक ट्रेंड आहे. म्हणजे मोबाइल विकत घेताना ग्राहक आता सिंगल कोअर, डय़ुअल कोअर, क्वाड कोअर प्रोसेसर तसेच हल्ली ऑक्टोकोअर प्रोसेसर आदिंबद्दल चर्चा करताना दिसतात.
पण प्रोसेसरचे कोअर म्हणजे नेमकी काय भानगड आहे?
सिंगल कोअर प्रोसेसर
सिंगल कोअर प्रोसेसर म्हणजे यामध्ये एकच प्रोसेसर असतो. सिंगल कोअर प्रोसेसर हे थोडय़ा धिम्या गतीने काम करीत असले तरी त्यासाठी ते कमी पॉवर वापरतात. त्यामुळे अशा मोबाइलचा बॅटरी बॅकप हा खूप चांगला असतो. मात्र मोबाइलला जेव्हा अनेक जास्त टास्क पार पाडायची वेळ येते अशावेळी सिंगल कोअर प्रोसेसर एक एक करून टास्क पार पाडतो.
डय़ुअल कोअर प्रोसेसर
डय़ुअल कोअर प्रोसेसर म्हणजे यामध्ये दोन कोअर असतात. म्हणजेच वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे यामध्ये दोन मेंदू असतात. जेव्हा दोन वेगवेगळी टास्क करण्याची वेळ स्मार्टफोनवर येते तेव्हा डय़ुअल कोअर प्रोसेसर एकाचवेळी दोन वेगवेगळे टास्क पूर्ण करू शकतो. म्हणजे सिंगल कोअर प्रोसेसरला याच टास्क पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा निम्म्या वेळेत डय़ुअर कोअर प्रोसेसर या टास्क पूर्ण करतो. मात्र सिंगल कोअर प्रोसेसरच्या तुलनेत डय़ुअल कोअर प्रोसेसरला पॉवर जास्त लागते.
क्वाड कोअर प्रोसेसर
क्वाड कोअर प्रोसेसरमध्ये चार प्रोसेसर असतात. त्यामुळे डय़ुअल कोअर प्रोसेसरच्या तुलनेत क्वाड कोअर प्रोसेसरचा काम करण्याचा स्पीड हा दुप्पट होतो. कारण एकाच वेळेस चार वेगवेगळ्या टास्क पार पाडण्याची क्षमता यामध्ये असते. मात्र त्यासोबत याला जास्त बॅटरी लागते हेही तेवढेच खरे आहे. गेम्स, व्हिडिओ एडिटर, ग्राफिक्स प्रोग्राम्स आदिंसाठी क्वाड कोअर प्रोसेसर उपयुक्त ठरते. मात्र हल्लीचे लेटेस्ट क्वाड कोअर किंवा ऑक्टोकोअर प्रोसेसर आहे यामध्ये अॅडव्हान्स आर्क टेक्चर वापरले असल्यामुळे पॉवर कन्झुमशन कमी होते कारण वापरात नसलेले प्रोसेसर कोअर बंद करण्याची व जेव्हा गरज तेव्हाच इतर कोअर वापरण्याची तंत्र या नवीन प्रोसेसर आर्किटेक्टमध्ये असते, त्यामुळे पॉवर सेव्ह होते.
मेमरीचा रोल महत्त्वाचा
जास्त कोअरचा प्रोसेसर असला म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड जास्त वाढतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी मेमरीचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण एखादी टास्क पूर्ण करण्यासाठी प्रोसेसर मेमरी (रोम आणि रॅम)ची मदत घेतो. त्यामुळे जास्त कोअरचा प्रोसेसर असलेला स्मार्टफोन घेताना त्याची रॅम आणि रोम किती आहे हे पाहणोही तेवढेच महत्त्वाचे आहे.
---------
anil.bhapkar@lokmat.com