आष्टी ते लातूर आणि पुढे...

By admin | Published: February 1, 2017 03:57 PM2017-02-01T15:57:16+5:302017-02-01T15:57:16+5:30

वयाच्या १३ व्या वर्षी. इयत्ता आठवीत मी घर सोडलं... शिक्षणासाठी, लेकानं डॉक्टर व्हावं या इच्छेपोटी घरच्यांनी लातूर शहरात शाळेत घातलं... पण वयाच्या त्या अडनिड्या वळणावर जगण्यानं परीक्षाच पाहिली तेव्हा...

Ashti to Latur and beyond ... | आष्टी ते लातूर आणि पुढे...

आष्टी ते लातूर आणि पुढे...

Next

- आमीर शेख


मी ज्या प्रदेशातून स्थलांतर केलं त्या प्रदेशात स्थलांतर दोनच कारणांसाठी होतात. ज्यांचे खिसे गरम आहेत ते शिक्षणासाठी स्थलांतर करतात, तर ज्यांचे खिसे गरम नाहीत ते रोजीरोटीसाठी ‘कामगार’ म्हणून स्थलांतरित होतात. अशाच दोन टोकांवर जगणाऱ्या आणि उभ्या महाराष्ट्राला ‘ऊसतोड कामगार’ पुरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील ‘आष्टी’ या गावाचा मी मूळ रहिवासी.
वयाच्या १३ व्या वर्षी शिक्षणाच्या निमित्तानं माझं पहिलं स्थलांतर झालं. ते ज्या काळात झालं तो काळ माझ्या मानसिक जडणघडणीच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि नाजूकही होता. ज्या कारणानं मी गाव सोडलं, त्याच कारणांसाठी त्याकाळी अनेकांनी सोडलं. 
लातूर, अहमदपूर, अहमदनगर आणि पुणे या चार शहरांमध्ये माझ्या स्थलांतराच्या गोष्टीनं आकार घेतला.
२००५ ची गोष्ट. मी नुकताच सातवीची परीक्षा उत्तम (९७%) मार्कांनी पास झालो होतो. अभ्यासात हुशार असलो की घरचे आणि समाज आपल्या आयुष्याचा पुढचा मार्ग स्वत:च ठरवून टाकतात. आयुष्याची गाडी पुढे डॉक्टर किंवा इंजिनिअर या दोनच रस्त्यांवर धावणार असते. मी डॉक्टर व्हायला हवं हा निर्णय आमच्या परस्पर घरच्यांनी घेऊन टाकला होता. त्याकाळी लातूर पॅटर्नची चलती होती. लातूर शहरातील राजर्षी शाहू कॉलेज हे डॉक्टर, इंजिनिअरची फॅक्टरी समजलं जायचं. तिथं अकरावीत प्रवेश मिळाला की, तुम्ही डॉक्टर होणार हे नक्की. परंतु त्या ठिकाणची अ‍ॅडमिशन केंद्रीय पद्धतीने व्हायची. लातूर जिल्ह्यातील मुलांसाठी बहुसंख्य जागा राखीव असायच्या. त्यामुळं तिथं प्रवेश मिळणं म्हणजे काय ते दिव्य. तिथं माझी वर्णी लागावी म्हणून आम्ही आठवीपासूनच लातूरमधे शिकावे, असा निर्णय घेण्यात आला.
जून २००५ मध्ये मी लातूर या पूर्वी कधीही न पाहिलेल्या संपूर्ण नव्या शहरामधे, नव्या वातावरणामधे माझ्या (इतरांनी ठरविलेल्या) स्वप्नांसहित दाखल झालो.
खरं तर ही एक नवीन आयुष्याची सुरुवात होती. माझ्या प्रदेशातील लाखो मुुलांना जी संधी या व्यवस्थेने नाकारली होती ती संधी मला मिळाली होती. पण या संधी सोबतच प्रचंड प्रेशर माझ्यावर होतं. तोपर्यंत दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मुलांचं स्थलांतर व्हायचं. दहावीपूर्वीच शिक्षणासाठी स्थलांतरित होणारा मी माझ्या गावातील पहिलाच होतो. घरच्यांच्या प्लस गावाच्या अपेक्षांचे ओझे घेऊन मी लातूर शहरात दाखल झालो.
बाबांनी मला एक खोली करून दिली. ते हॉस्टेल नव्हते. एका प्राध्यापकांचे घर होते. त्यांच्याकडे सात खोल्या भाड्याने होत्या. पैकी सहा खोल्यांमधे माझ्या गावाचीच मुुलं होती. ती सर्व अकरावी-बारावीत होती. एवढा एक कम्फर्ट झोन. सुरुवातीचे तीन दिवस बाबा माझ्यासोबत राहिले. आवश्यक त्या सामानाची खरेदी करून दिली. मेस दाखवली, शाळा दाखवली. मी रस्ता चुकू नये म्हणून सर्व आवश्यक खाणाखुणा दाखवून दिल्या. ते पावसाळ्याचे दिवस होते. सो, आजही पाऊस पडला तर मला नर्व्हस वाटायला लागलं. 
शाळेचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. आधीच इण्ट्रोवर्ड असणारा मी आणि त्यात अनेकविध न्यूनगंडांची सोबत. हा न्यूनगंड जातीचा होता. ज्या आर्थिक, सामाजिक स्तरातून आलो त्याचा होता. माझ्या दिसण्याचा होता. भाषेचा होता. मिक्स नव्हते. नशीब फक्त मुलांचा वर्ग होता. मुली असतील तर काय या भीतीनं मी सेमी इंग्रजी वर्गातही जाणं टाळलं.
त्याकाळी मोबाइल्सही नव्हते. फक्त श्रीमंतांकडे मोबाइल फोन असायचे. दर दोन दिवसांनी एसटीडी बुथ वर जाऊन मला घरी फोन करावा लागायचा. पारंपरिक कुटुंब. टिपिकल बोलण्यापलीकडे, ख्यालीखुशालीपलीकडे भावनिक संवाद नसायचा. मनातील भावना, उसळलेला कल्लोळ मनातच रहायचा. पहिल्यांदाच घराबाहेर राहत होतो. स्वातंत्र्य होतं. सर्व प्रकारचे निर्णय स्वत:लाच घ्यावे लागत होते. पहिल्यांदाच मेसचे जेवण करत होतो. आधार होता तो सोबत राहणाऱ्या गावातील मुलांचा.
मी महागड्या क्लासमध्ये जात होतो. क्लासची बॅच. ५००-६०० मुलं-मुली असायचे, स्वतंत्र इमारती, पार्किंग. चप्पल आणि सायकलसाठीसुद्धा वेगळे स्टॅण्ड. बसायला सतरंज्या, बायोमेट्रिक्स हजेरी. टापटीप गुरुजी. घरचे पैसे खर्च करत होते. अभ्यासाचं प्रेशर होतंच. त्यामुळे मी माझ्याच कोशात रहायला लागलो. बुजलेला असायचो. अशात सहामाही परीक्षा जवळ आली. मराठीचा पहिला पेपर होता, अभ्यास झालेला नव्हता. भीतीनं मी कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पकडलो गेलो. खूप चर्चा झाली. बदनामी झाली. मेल्याहून मेल्यासारखे झाले आणि त्या अपमानाच्या भावनेतून भयानक त्रास झाला. मला ती गोष्ट लागली खूप. त्यात चूक माझी होती का व्यवस्थेची माहिती नाही. (त्यानंतर आजपर्यंत मी कधीही कॉपी नाही केली, पेपर कोरे ठेवले, ठेवले पण कॉपी नाही केली कधीच!)
शाळेतला इंटरेस्ट कमी होऊ लागला. पण माझ्या काळे सरांनी इंग्रजीची गोडी लावली. इथंच वाचनाची गोडी लागली. पुस्तकांची आणि वेगळ्या सामाजिक जगाची ओळख मला नरहरे सरांच्या क्लासमुळे झाली. ‘कोल्हाट्याचं पोर’ हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक. झपाटून गेलो मी या पुस्तकाने. मला माझीच कथा वाटली ती. या ठिकाणी संघर्षाला ठिणगी पडली आणि नवीन जगणं सुरू झालं.
लातूरमध्ये मला पुस्तकांची ओळख झाली. या ठिकाणी मी अनेक संस्था, चळवळींशी जोडला गेलो. भरपूर वाचन केलं. वाचनासाठी एकवेळ उपाशी राहून मेसचे एकावळेचे पैसे वाचवून पुस्तके घेतली. पुस्तकांसाठी पेट्रोलपंपावर रात्री काम केले. याच शहरात मी प्रेमातही पडलो. या शहराने मला मुस्लीम असल्याची जाणीव करून दिली तर दुसरीकडे प्रचंड प्रेम करणारी माणसेपण दिली. लिहायला लागलो, कविता करायला लागलो. मार्कांच्या स्पर्धेत मागे पडलो. पण मला माझी स्वप्नं सापडली, माझ्यातला मी मला सापडत गेलो. मी दहावीला जेमतेम ९० टक्के पाडू शकलो. शाहू कॉलेजला अ‍ॅडमिशन मात्र नाही मिळालं. घरच्यांचा अपेक्षा भंग झाला, नाचक्की झाली. मी पुन्हा डिप्रेशनमध्ये गेलो. पण या सर्वांतून बाहेर काढणारी पुस्तकं, माणसेही मला याच शहराने दिली. या शहराने उभे रहायला शिकवले. संघर्ष करायला शिकलो...
आणि पुढच्या स्थलांतराकडे निघालो...

( अक्षरमित्र ही वाचक चळवळ चालवणारा आमीर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतो, प्रवास आणि वाचन या दोन गोष्टींचा त्याला ध्यास आहे.)

Web Title: Ashti to Latur and beyond ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.