हार्ट टू हार्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:34 AM2018-04-19T08:34:24+5:302018-04-19T08:34:24+5:30

नुकतंच एक नवं यंत्र आलंय. हे यंत्र शरीरावर बसवलं, की संगणकाला आपोआप कळेल, आपल्या मनात काय चाललंय?

AlterEgo Headset By MIT Can Read Your Mind | हार्ट टू हार्ट!

हार्ट टू हार्ट!

googlenewsNext

- डॉ. भूषण केळकर

सध्या वेळी-अवेळी पाऊस पडतोय पण तरीही त्याबद्दलचे अनुमान अधिकाधिक बरोबर येतेय असाही अनुभव आहे. पॅसिफिकमधला ‘एल् निनो’चा प्रभाव नसणे आणि ‘इंडियन ओशन डायपोल’ची स्थिती या दोन गोष्टींमुळे यावर्षीचे पर्जन्यमान १०० टक्के सरासरी राहील हा अंदाज आहे. घाबरू नका. इंडस्ट्री ४.० वरून आपण शेतीविषयक लेखमालेत जात नाही आहोत; पण इंडस्ट्री ४.० मधील तंत्रज्ञानावर आधारित अनुमानाबद्दलच बोलतो आहोत!

परवाच १००० रोबॉट्सचे एकत्रित नृत्य झाल्याची बातमी समाजमाध्यमात होती! म्हणजे परत इंडस्ट्री ४.०!!
‘ऑल्टर इगो’ नावाच्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही ऐकले, वाचले असेल कदाचित. आता परवा परवा अमेरिकेत एक उपकरण (इंडस्ट्री ४.० वर आधारित) बनवलं गेलंय की जे तुम्ही तुमच्या जबड्याला व कानाला काही विशिष्ट पद्धतीने-बाहेरूनच-बसवले; की तुमच्या मनातले विचार तुम्ही ‘न बोलता’ संगणकाला (आणि म्हणजे मग इतरांनाही!!) कळतात! तोंडाने आपण आपल्या विचारांचा शब्दोच्चार केला नाही तरी आपल्या जबड्याच्या स्नायूंना जे सिग्नल केवळ आपण विचार करून जातात त्यावरून हे करता येते! ‘शब्देविण संवादू’ची नवी आवृत्ती!
अगदी परवाचीच बातमी अशी आहे की जशी आपण आधी पाहिलेली यंत्रमानव- ‘सोफिया’ होती तसा ‘चार्लस्’ नावाचा पुरुष यंत्रमानव पण बनवलाय! त्याच्यामध्ये २४ कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे येणारी माहिती तो पृथक्करण करतो आणि अगदी मानवाप्रमाणे हावभाव व चेहऱ्याच्या हालचाली हुबेहूब करतो म्हणे!

माझ्या मनात आपला भाबडा विचार आला की जर हा ‘चार्लस्’ त्या ‘सोफिया’ ला भेटला तर ‘पहिली नजर’ (२४ कॅमेरांच्यामुळे!) किंवा ‘जनम जनम का रिश्ता’ वगैरे त्याला होईल का? शेवटी माझ्या मते इंडस्ट्री ४.० मधले हे ‘अ‍ॅडम आणि ईव्ह’च आहेत की आणि आजसुद्धा ‘अ‍ॅपल’ जोरात आहे!! हा ‘चार्लस्’ त्या ‘सोफिया’च्या प्रेमात पडला तर चेहºयावर हावभाव कसे दाखवेल? समजा ते ‘ऑल्टरइगो’ उपकरण त्या चार्लस्च्या जबड्याला लावलं तर? वाचकहो मला या प्रश्नांबद्दल दोष देऊ नका. शेवटी ‘बॉलिवूड’वर ज्यांचा पिंड पोसलेला असतो त्यांना हे प्रश्न पडणारच की!

मागील भागात आपण ‘क्लाउड’चा धागा पकडला होता; तो पुढे नेऊ. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या काही, तांत्रिक बाबी बघण्याआधी अगदी सोप्या भाषेत हा सगळा ‘क्लाउड’ काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा किती अवघड काम आहे- ‘क्लाउड’ ने भरलेलं आकाश ‘निरभ्र’ करायचा हा प्रयत्न.’

आपण दुकानातून शॅम्पूची, तेलाची, साबणाची खरेदी करतो; पण प्रवासाला जाताना त्याच गोष्टींची छोटी-छोटी ‘सॅशे’ (१ ते ५ रुपयाला असतात ना, ती) विकत घेतो. म्हणजेच जेवढी गरज आहे तेवढेच विकत घेतो आणि बॅगेत भरतो. ‘क्लाउड’ यापेक्षा वेगळे नाही! एखादी यंत्रणा, कॉम्प्युटरची गरज, एखादे सॉफ्टवेअर हे जेवढे लागेल तेवढेच आणि जेव्हा लागेल तेव्हाच वापरता येणे- त्यासाठी इंटरनेटचा वापर करणे आणि ते ‘भाडेतत्त्वावर’ घेणे म्हणजे क्लाउड! आपण संपूर्ण रस्ता बांधत नाही त्याचा पूर्ण खर्च आपण देत नाही; तो आपल्या मालकीचाही नसतो, पण टोल भरला की आपण तो वापरू शकतो. केव्हाही, कुठेही, कधीही जायला अगदी तस्सच तंत्रज्ञान वापरणे, म्हणजे ‘क्लाउड’!!

यामध्ये व्हर्च्युअलायझेशन हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. भौतिक संसाधनांचे अमूर्त रूपांतर वापरून ते अनेक यूझर्सना वापरता येणे हा यातला मुख्य गाभा आहे. तांत्रिक भाषेत याला ‘मल्टिटेनन्सी’ म्हणतात. सॉफ्टवेअर अ‍ॅज अ सर्व्हिस (सास) वगैरे संज्ञा आपण ऐकतो, त्या यातल्याच. डिस्ट्रिब्युटेड/ग्रिड कंप्युटिंगचं पुढचं पाऊल, सर्व्हिस ओरिएन्टेड आर्किटेक्चर (एसओए) चं नवं रूप- आधुनिक रूप म्हणजे क्लाउड!

संसाधनांच्या वापरातील लवचिकता, भाडेतत्त्वावर असल्याने किंमत अत्यंत कमी आणि मेंटेनन्स नाहीच, अशा सर्वगुण संपन्नतेमुळे ‘क्लाउड कंप्युटिंग’ हे तंत्रज्ञान तुमच्या आमच्या करिअरमध्ये यशाचा पाऊस पाडू शकतं हे तर नक्कीच!

(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: AlterEgo Headset By MIT Can Read Your Mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.