धनश्री संखे (ब्यूटी एक्सपर्ट) -
छोट्या केसांची फॅशन होती, आता पुन्हा लांबसडक केसांची फॅशन आली आहे. अनेकजणींना वाटतं, आपलेही लांब सुंदर सुळसुळीत केस असावेत. कुणाचे केस वाढतच नाहीत, तर कुणाकुणाचे फार गळतात. अनेकींना लांब केस ‘मेण्टेन’ करणं हीच एक अडचण वाटते. मात्र तुम्हाला लांब केस आवडत असतील आणि तुमचे केस लांब असतील तर ते उगीच कापू नका, ते ‘मेण्टेन’ कसे करायचे, हे फक्त शिकून घ्या.
कसे?
१) लांब केस आवडणं वेगळं, ते वाढवणंही सोपंच, मात्र वाढलेले लांब केस सांभाळणं फार अवघड, त्यासाठी रोजच्या रोज काही सवयी आपण स्वत:ला लावून घ्यायला हव्यात.
२) साधारण प्रत्येकाचेच केस महिन्याला २ इंच वाढतात. त्यामुळे आपले केस वाढतच नाही असं म्हणू नका, जरा धीर धरा. हळूहळू तुमच्या केसांची वाढ नक्की तुमच्या लक्षात येईल.
३) केस लांब असतील किंवा वाढवायचेच असतील तर आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मसाज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातून माथ्यावरचं ब्लड सक्यरुलेशन सुधारतं आणि केसांचं पोषणही होतं.
४) रात्री केसांना तेल लावून झोपायचं असं अनेकजणी करतात. पण त्यामुळे केस जास्तच चिप्पू चिप्पू दिसू शकतात. झोपेत तुटतातही. जास्त तेलकट केसही लवकर तुटतात. त्यामुळे हा प्रयोग काही फार सोयीचा नाही. त्यापेक्षा नहाण्यापूर्वी सकाळी तेल लावा.
५) मात्र केस फार कोरडेही होता कामा नये, त्यामुळेही ते जास्त तुटतात. अधूनमधून तेल ताल लावणं गरजेचंच.
६) ओले केस विंचरताना कायम मोठय़ा दातांचा कंगवा वापरा. लहान कंगव्याने विंचरलं तर गुंता जास्त होतो, केस अडकून तुटतात. अनेकजणी कुठलाही प्लास्टिकचा कंगवा केस विंचरण्यासाठी वापरतात, त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा हेअर ब्रश वापरा. त्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी होईच पण डोक्यावरचं ब्लड सक्यरुलेशनही सुधारेल.
७) स्पीट हेअर म्हणजेच उंदरी लागलेले केस कापायचेच असं अनेकजणींना वाटतं, पण खरंच उंदरी लागलेली आहे का, केसांना फाटे फुटलेत का हे जरा पहा, तसं असेल तरच केस कापा.
८) केस मोकळे सोडून कधी झोपू नका. त्यानं गुंता जास्त होतो आणि केस तुटतातही फार.
९) शक्य असेल तर केसांना सॅटिनचा स्कार्फ बांधून झोपा. सॅटिनची उशी डोक्याखाली घेणं चांगलं. केसांचं मॉयश्चर त्यानं टिकून राहतं.
१0) तुमचे केस लांब असतील तर प्रोटीन आणि हेअर स्पा नियमित करून घेणं उत्तम. स्काल्प डिटॉक्स करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
११) केसांना कायम बोटांनी श्ॉम्पू लावा. क्लॉकवाईज आणि अँण्टी क्लॉकवाईज लावावा. त्यामुळे केस कमी तुटतात. केसांना कंडिशनर लावतानाही माथ्यावर लावू नये, खालच्या बाजूला लावावं. अनेकजणींना शॅम्पू करण्याची ही पद्धतच माहिती नसते. ही योग्य पद्धत शिकून घेतली तर केसांना मदतच होईल.
१२) ओले केस बांधण्यासाठी कॉटनचा टॉवेल, पंचा वापरावा. केस घसघसून पुसू नयेत.