आई शप्पथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 08:48 AM2018-05-24T08:48:31+5:302018-05-24T08:48:31+5:30

आईची खोटी शपथ कुणी घेतं का? खेळात? चिडीचा डाव खेळताना? खरं-खोटं करताना कुणी घेतं का अशी खोटी शप्पथ? या प्रश्नातून उलगडणारा एक निरागस प्रवास.

aai shappath short film | आई शप्पथ

आई शप्पथ

Next

aai shappath short film
- माधुरी पेठकर

लहानपणी मित्र-मैत्रिणींसोबत खेळ खेळण्याची मजा सगळ्यांनीच अनुभवलेली असते. त्यात क्रिकेटसारखा खेळ असेल तर मग घरासमोरचं छोटं अंगणही खरंखुरं पिच वाटू लागतं. या पिचवर खेळताना मग जिगरीनं खेळणं आलंच. बरं एलबीडब्ल्यू, स्टम्पआउट या सारख्या विवादास्पद परिस्थितीत अम्पायरसारखं कोणी तटस्थ मत देणारं नसतं. आणि असे निर्णय सहजासहजी मान्य होणारेही नसतात. आउट म्हटलं की आधी तो निर्णय नाकारायचा, मग इतरांनी विरोध करायचा. आपण कसे आउट नव्हतो हे सांगणारा आणि आउट आहेच म्हणणारे वाद घालणार. मग एका निर्णायकक्षणी कोणीतरी एक हुकुमाचा एक्का बाहेर काढतो, ‘आई शप्पथ’ म्हणतो. मग काय त्याचं म्हणणं मान्य होतं. निकष काय तर ‘आईची शप्पथ’ कोणी अशी खोटी घेतं का? आणि मग पुढे खेळ चालू.
लहान मुलांच्या जगात आईच्या शपथेचं हे इतकं महत्त्वं. जेव्हा जेव्हा खऱ्याची कसोटी लागणार तेव्हा तेव्हा आईच्या शपथेसारखं अस्त्र चालवलं जातं आणि विशेष म्हणजे ते चालतंही. लहान मुलांच्या निरागस जगातलं हे प्रामाणिकपणाचं चलन एका फिल्मचा विषय बनतं. या विषयाभोवती कथा गुंफली जाते. ती कथा दृश्य रुपात मांडण्यासाठी लोकं एकत्र येतात आणि मग एक शॉर्ट फिल्म आकारास येते. गौतम वझे लिखित, दिग्दर्शित ‘आई शप्पथ’ ही पंधरा मिनिटांची शॉर्ट फिल्म एका शपथेच्या निमित्तानं लहान मुलांचं निरागस विश्व उभं करते.
कथा मुंबईतल्या एका चाळीची. आई शप्पथ ही शॉर्ट फिल्म सोहम या लहानग्याची मानसिकता सांगणारी असली तरी त्यात आई-बाबा, मामा, मामी, चाळीतल्या सोहमच्या मित्रांची टीम, शेजारची ताई, चाळीतल्या आजी असे बरेच जण आहेत. अनेकजण त्यात डोकावतात. कोणी एखादं वाक्य बोलण्यापुरतीच असतं; पण एक विशिष्ट विचार पेरण्यासाठी ती व्यक्ती पुरेशी असते. १५ मिनिटांत सोहमच्या गोष्टीत हे सर्वजण भेटतात.
चाळीतल्या अंगणात (थोड्याशा मोकळ्या जागेत) मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगलेला असतो. सोहमही त्यात असतो. नेहमीच्या टीमसोबत सोहमचा मामेभाऊ निनादही खेळत असतो. निनाद आउट होतो (आणि खरं तर तो आउटच असतो) पण त्याला डाव सोडायचा नसतो. हरप्रकारे आपलं म्हणणं मांडून झाल्यानंतर शेवटी तो ‘आई शप्पथ मी आउट नाही’ हे सांगून मुलांना गप्प करतो. सोहमच्या मनाला काही ते पटत नाही. निनादनं खोटी आईची शप्पथ घेतली हे त्याला माहीत असतं. आता सोहमच्या मनात मामीची काळजी दाटून येते. क्षणाक्षणाला त्याला वाटतं की निनादनं आईची खोटी शप्पथ घेतली म्हणजे मामीला काहीतरी होणार. आता मामी मरणार. सोहम मनातून घाबरतो. आपली मामी मरणार तर नाही ना? विचारानं कासावीस होतो. गच्चीवर पापड वाळत घालायला गेलेली मामी गच्चीवरून पडून, जेवताना ठसका लागला असता श्वास अटकून किंवा आजीसारखी रात्री झोपल्यानंतर झोपेतच मरणार नाही ना? असा क्षणोक्षणी मामीच्या जिवाचा घोर सोहमला लागून राहतो. दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेली मामी ठाण्याला जायला निघते तेव्हा मामीला प्रवासात काही होणार नाही ना? या काळजीनं सोहम अस्वस्थ होतो. दोन तासांचा रस्ता पण संध्याकाळ होऊन जाते तरी मामीचा फोन नाही, फोनही आउट आॅफ रेंज यासर्व गोष्टींमुळे सोहमला आपल्या मनातली भीती खरी झाल्याचं वाटतं. सोहमच्या मनातल्या भीतीचा प्रवास प्रेक्षकांना फिल्मच्या शेवटपर्यंत फिल्ममध्ये गुंतवून ठेवतो.
एका शपथेच्या निमित्तानं सोहमसारख्या लहान मुलांचं मनोविश्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक गौतम वझेनं केला आहे. व्यवसायानं जाहिरात निर्माता असलेला गौतम हौस म्हणून कथा लिहितो. पण प्रत्येक कथेची काही फिल्म होत नाही. ज्या कथेत ‘व्हिज्युअल एलिमेण्ट्स’ असतात त्याच कथेची फिल्म होते. मोठी माणसं काही समजुती परंपरेनं घेऊन चालतात. त्यांना प्रश्न विचारत नाही. मोठ्यांकडून या समजुती लहानांमध्ये रुजतात. लहान मुलंही त्यांना प्रश्न विचारत नाही. आईची शप्पथ खोटी घ्यायची नसते, नाहीतर मग आईला काहीतरी होतं ही समजूत लहान मुलांच्या मनात पक्की रूतून बसलेली. गौतमला या समजुतीमध्ये एक कथा सापडली. मग कथेमध्ये फिल्मचे घटक सापडले. मुंबईतली चाळ, चाळीतलं वातवरण, छोट्या जागेत रंगणारा मुलांचा मोठा खेळ, लहान मुलाच्या मनातला झगडा हे सर्व व्हिज्युअली दाखविण्यातली गंमत ओळखून गौतमनं या कथेवर शॉर्ट फिल्म करण्याचं ठरवलं. या फिल्मचा यूएसपी अर्थातच सोहमचं पात्र. सोहमच्या शब्दांपेक्षा त्याचा चेहरा बोलायला हवा. अशा बोलक्या चेहºयाचा शोध घेण्यासाठी गौतमनं डोंबिवली ते बोरविली अशा सर्व शाळा पालथ्या घातल्या. आणि मग शारदाश्रमात अभिषेक बाचणकर या मुलात सोहमचा चेहरा सापडला.
आपण एक कथा लिहितो. ती आपल्याला आवडते. मग ती आणखी चारजणांना आवडते. या आवडण्याच्या प्रक्रियेतून फिल्मला आवश्यक असलेला क्रू जमतो आणि एक स्वप्न साकार होतं ही प्रक्रिया गौतमसाठी महत्त्वाची होती. पूर्ण लांबीच्या चित्रपटांमध्येच अर्थपूर्णता, करमणूक शोधणाºया प्रेक्षकांना शॉर्ट फिल्मकडे वळवणं सोपं नाही. त्यासाठी टेÑण्ड सेट करावा लागतो. आणि हा टेÑण्ड सेट करायचा असेल तर मग शॉर्ट फिल्मच्या कथेपासून त्याच्या मांडणीपर्यंत सर्वच गोष्टीत एक विचार असावा लागतो, परफेक्ट प्रयत्न असावे लागतात. शॉर्ट फिल्मच्या बाबतीत हा नेमका विचार असणाºया गौतमनं एक छोटीशी गोष्ट पूर्ण ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न ‘आई शप्पथ’ या आपल्या पहिल्याच शॉर्ट फिल्मद्वारे केला. त्याच्या या प्रयत्नाला महत्त्वाची दाद म्हणजे मुंबई फिल्म फेस्टिव्हल अर्थात मामि २०१८ चा ‘बेस्ट लार्ज शॉट फिल्म’ हा पुरस्कार मिळाला.
 

Web Title: aai shappath short film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.