2020 : का? कोण? काय? कधी? - तरुण लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 07:30 AM2020-01-02T07:30:00+5:302020-01-02T07:30:02+5:30

विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

2020: Why? Who? What? When - youth form all over Maharashtra sharing their life story in twenties | 2020 : का? कोण? काय? कधी? - तरुण लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट!

2020 : का? कोण? काय? कधी? - तरुण लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट!

Next
ठळक मुद्देमुला-मुलींनी  ‘ऑक्सिजन’ला सांगितली आपल्या  ‘विशी’ची सिक्रेट्स

ऐन विशीच्या उंबरठय़ावर उभ्या  तरुण मुलामुलींना ‘ऑक्सिजन’ ने  विचारले होते काही थेट प्रश्न  . आणि त्यांची  उत्तरं  म्हणून समोर आले विशीतले  काही बेहद खुबसुरत आणि तितकेच गडद अस्वस्थ रंग!  2020- या नव्या ट्वेन्टी ट्वेन्टीचा प्रवास आरंभ करताना  जगण्याच्या  विशीचे  रंग  उलगडणारा हा खास अंक ! 1827 मुला-मुलींनी  ‘ऑक्सिजन’ला सांगितली आपल्या  ‘विशी’ची सिक्रेट्स.  त्यातल्या निवडक मनोगतांचा समावेश असलेला हा विशेषांक!

जाईन, पण परत येईनच येईन! 

संधी मिळाली, तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?
- असा एक प्रश्न ऑक्सिजनने या चर्चेमध्ये विचारला होता.
फक्त एका मुलीचा अपवाद सोडून आलेली सगळी उत्तरं अगदी एकमेकांची कॉपी करून लिहिलेली असावीत, इतकी एकसारखी, एका साच्याची दिसतात (म्हणूनच ही एकसाची उत्तरं प्रसिद्ध केलेली नाहीत).
जो-तो आणि जी-ती एकच म्हणते आहे र्‍
संधी मिळाली तर मी परदेशात शिकायला नक्कीच जाईन. कारण हा अनुभव मला जग बघायची संधी देईल, नवे अनुभव मिळतील, चांगला जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतील. मी परदेशात शिकायला जाईन, शिक्षण पूर्ण झाल्यावर अनुभव घेण्यासाठी म्हणून तिथे नोकरीही करीन; पण परत येईन म्हणजे येईनच!
- संधी मिळाल्यास परदेशी जायला उत्सुक असलेल्या मुला-मुलींना आपल्या परत येण्याची इतकी खात्री का बरं वाटत असावी? किंवा हे परत येणं अपरिहार्यच आहे, असं त्यांचं म्हणणं कशातून आलं असावं?
मुलांनी दिलेल्या कारणांमध्ये दोन मुद्दे कॉमन आहेत र्‍ मातृभूमीची हाक आणि आई-वडिलांना त्यांच्या उतारवयात सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे याचं भान! 
परदेशात कायमचं निघून जाणं म्हणजे आपल्या देशाशी द्रोह आहे, अशी भावना या पिढीतल्या किमान ग्रामीण आणि निमशहरी वर्गात तरी नक्कीच प्रबळ असावी. 
परदेशात जायची संधी मिळालीच, तर तिथल्या अनुभवावरून वेळ येईल तेव्हा ठरवीन, असा रोकडा रस्ता कुणीही (निदान या चर्चेत तरी) पत्करलेला नाही. मी भारतात परत येईन, कारण भारतातही भविष्यात संधी असतील, असं वस्तुस्थितीच्या जवळ जाणारं उत्तर अगदी अपवादानेही वाचायला मिळालं नाही. 
निमशहरी भागात राहणारी आणि सततच्या बंधनांनी पिचलेली एक मैत्रीण मात्र अगदी मनातलं आणि खरं बोलली. तिने लिहिलं आहे, ‘हा प्रश्न तुम्ही मला विचारूच नका, इथे माझी फॅमिली मला मुंबईला जायची परवानगी देताना मारामार आहे; परदेशाचं काय घेऊन बसलात?’

************
पराकोटीचा अभिमान, ..आणि टोकाचा संताप!

भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
- असा एक थेट प्रश्न ऑक्सिजनच्या प्रश्नावलीत शेवटी होता.
सध्याच्या एकूण सामाजिक वातावरणाने, त्यात पेटलेल्या संतापाने अस्वस्थ असलेल्या कुणालाही दिलासा वाटावा, अशी (एकसाची) उत्तरं या प्रश्नाला समस्त मुला-मुलींनी दिलेली आहेत (म्हणूनच अपवाद वगळता ही उत्तरं प्रसिद्ध केलेली नाहीत).
लिंग-जात-धर्म-आर्थिक परिस्थिती असल्या कोणत्याही भेदाभेदाचा विचार न करता सर्व नागरिकांना समानतेने वागवण्याची खात्री आणि समान हक्क देणारी भारताची राज्यघटना, अवघ्या जगाला आकर्षून घेणारी या देशाची प्राचीन संस्कृती, शत्रूशीही दिलदारीने वागण्याचे या मातीतले संस्कार, दीर्घ गुलामीनंतर सर्वच क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आणि या देशाशी जोडलेल्या सर्वधर्मसमानतेचा, समजुतीच्या सह-अस्तित्वाचा धागा या सगळ्या सगळ्या गोष्टींचा मला विलक्षण अभिमान वाटतो, असं मुलं लिहितात. भारतातली संपन्न अन्नसंस्कृती, परस्परांना आधार देणारी कुटुंबव्यवस्था अशा अनेकानेक गोष्टी मुलांसाठी अभिमानबिंदू आहेत.
- आणि ज्याचा ज्याचा राग येतो, संताप येतो, लाज वाटते त्याही गोष्टींच्या यादीवर जणू सर्वव्यापी एकमत आहे.
स्रियांवर होणारे बलात्कार, या नृशंस गुन्ह्याच्या शिक्षेचा झटपट निवाडा करण्यात अपयशी ठरलेली न्यायव्यवस्था, देशात मान वर काढणारी झुंडशाही, आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या झुंडींना झुंजवणारे निर्लज्ज राजकारणी, भ्रष्टाचार या सगळ्याबद्दल विशीतल्या तारुण्याच्या मनात कमालीची तिडीक आहे. रस्त्यात पचापचा थुंकणारे लोक, वाहतुकीच्या नियमांसारखी सामाजिक शिस्त अजिबात न पाळणारे लोक, मुलींना दुय्यम स्थान देणारी मागास मनोवृत्ती याची आपल्याला लाज वाटते, असंही मुलांनी कळकळीने नोंदवलेलं आहे. 
  ‘संध्याकाळी सहानंतर मला घराबाहेर राहण्याची परवानगी नाही. माझ्यावर ही असली बंधनं घालतात म्हणून मला माझ्या आईबाबांचा फार राग येतो.. आणि आपल्या तरुण मुलीवर अशी बंधनं घालण्याची वेळ माझ्या आईबाबांवर येते, म्हणून मला या देशाची लाज वाटते ’- असं एका मुलीने स्पष्ट लिहिलं आहे.

Web Title: 2020: Why? Who? What? When - youth form all over Maharashtra sharing their life story in twenties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.