कराची : झिम्बाब्वेच्या खेळाडूंना देशात खेळायला येण्यासाठी लाच दिल्याच्या वृत्ताचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इन्कार केला. अशाप्रकारच्या अफवा पसरविणे हा गुन्हा असल्याचे पीसीबी प्रमुख शहरयार खान यांचे मत आहे.दौरा करण्यासाठी झिम्बाब्वेच्या प्रत्येक खेळाडूला १२.५०० अमेरिकन डॉलर लाच म्हणून देण्यात आल्याचे वृत्त मीडियाने प्रकाशित केले होते. याशिवाय दौऱ्याआधीच पीसीबीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला पाच लाख अमेरिकन डॉलरची लाच दिल्याचेही वृत्तात म्हटले होते.झिम्बाब्वेने पाक दौरा करावा, यासाठी एक करार करण्यात आला. पण, लाच देण्याची शिफारस कुणालाही करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करीत शहरयार पुढे म्हणाले, की पीसीबीने एक समझोता करार केला, याचा अर्थ असा नव्हे, की आम्ही खेळाडूंना लाच दिली. पाक दौरा करण्यासाठी आम्ही अन्य संघांनादेखील पैसे देऊ, असा याचा अर्थ नाही. झिम्बाब्वेचा पाक दौरा यशस्वी झाला आहे. हा दौरा करण्याबद्दल मी झिम्बाब्वेचे खेळाडू आणि त्यांच्या बोर्डाचा आभारी आहे.२००९ मध्ये श्रीलंका संघावर पाकमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला, तर आठ खेळाडू जखमी झाले होते. तेव्हापासून एकही संघ पाकचा दौरा करीत नाही. पाकमध्ये खेळलेला झिम्बाब्वे पहिला संघ ठरला.(वृत्तसंस्था)
झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लाच दिली नाही : पीसीबी
By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST