विशाखापट्टणम : स्टार खेळाडू रिशांक देवाडीगा (११ गुण), अनुप कुमार (६ गुण) यांच्या अफलातून जिगरबाज चढाया, विशाल मानेच्या नेत्रदीपक पकडींच्या जोरावर गतविजेत्या यू मुंबा संघाने प्रो कबड्डी स्पर्धेत तेलगू टायटन संघाचा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. कबड्डी महासंघाच्या मान्यतेने राजीव गांधी इनडोर हॉलमध्ये सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या मोसमातील यू मुंबा आणि तेलगू टायटन यांच्या लढतीत यू मुंबाने २७-२५ गुणांनी विजय नोंदविला. लढतीच्या सुरुवातीपासूनच यू मुंबा संघाचा कर्णधार अनुप कुमार आपल्या पहिल्याच चढाईत गुण घेऊन तेलगू संघावर दबावतंत्र सुरू केले. त्यानंतर यू मुंबाचा आक्रमक खेळाडू रिशांकने आपल्या पहिल्या दोन चढायांमध्ये ७ गुण मिळवून विरुद्ध संघावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच तेलगू टायटनविरुद्ध लोन चढविला. रिशांकने सुपर रेडमध्ये ५ गुण मिळविले. यू मुंबाच्या विशाल मानेने ेटायटनच्या दोन खेळाडूंची उत्कृष्ट पकड केली. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा यू मुंबाकडे ११-८ अशी आघाडी होती. तेलगू टायटनच्या घरच्या मैदानावर खेळत असतानासुद्धा त्यांच्या राहुल चौधरी व सुकेश हेगडेला सूर काही गवसत नव्हता. विश्रांतीनंतर तेलगू टायटनच्या मार्गदर्शकांनी दिलेला कानमंत्र तंतोतंत अंमलात आणण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या राहुल चौधरी आणि सुकेश हेगडे यांच्या चढाया यशस्वी होऊ लागल्या. सुकेशने आपल्या आक्रमक चढायांच्या जोरावर यू मुंंबाचा बचाव खिळखिळा केला. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना त्यांनी यू मुंबावर लोन चढविला. त्यावेळी यू मुंबाकडे २७-२२ अशी आघाडी होती. पण शेवटी रिशांक आणि अनुपच्या चढायात गुण मिळाल्याने त्यांनी २७-२५ असा विजय नोंदविला. सुकेश हेगडेला उत्कृष्ट चढायाचा पुरस्कार देण्यात आला. धर्मराज चेरालाथान सामनावीर ठरला. (वृत्तसंस्था)
यू मुंबाची विजयी सलामी
By admin | Updated: January 31, 2016 03:05 IST