Iga Swiatek Won Her Maiden Wimbledon Title 2025 : ऑल इंग्लंड क्लबच्या ग्रास कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा स्वियातेक हिने अमांडा अनिसिमोव्हा हिला ६-०, ६-० अशा फरकाने पराभूत करत विम्बल्डनचे पहिले वहिले जेतेपद पटकावले आहे. या जेतेपदासह इगा स्वियातेक ही विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी पोलंडची पहिली महिला टेनिसपटू ठरलीये.
ग्रँडस्लॅमच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं
ग्रँडस्लॅमच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला एकेरीतील फायनलची लढत सर्वात कमी वेळेसह ६-०, ६-० अशा स्कोअर लाइनसह संपली. याआधी १९८८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत स्टेफी ग्राफ हिने नताशा झ्वेरेव्हा हिला अशा फरकाने पराभूत केले होते. ३४ मिनिटांत सामन्याचा निकाल लागला होता. विम्बल्डनमध्ये अमेरिकन अमांडा हिच्यावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. सलग दोन सेटमध्ये हतबल ठरल्यावर कोर्टवर मॅच खेळतानाच अमांडा अनिसिमोव्हाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मॅचनंतरही ती ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले.
अनिसिमोव्हाने नंबर वनला मात दिली, पण...
अमेरिकन अनिसिमोव्हाने उपांत्य फेरीत अग्रमानांकित आर्यना संबालेंकाला पराभूत करत पहिल्यांदा फायनल गाठली होती. त्यामुळे इगा स्वियातेकला ती आव्हान देईल, असे वाटत होते. पण ग्रास कोर्टवर आतापर्यंत छाप सोडण्यात अपयशी ठरलेल्या स्वियातेकनं सर्वोत्तम खेळ करत तिला एक सेटही जिंकू दिला नाही. मातीवरील कोर्टच्या राणीनं (फ्रेंच ओपन) विम्बल्डनच्या यंदाच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात विक्रमी विजयासह विम्बल्डनमध्ये पहिले वहिले जेतेपद पटकावले आहे.
सहाव्या ग्रँडस्लॅनवर कोरले नाव
स्वियातेकनं पहिला ग्रँडस्लॅम विजय २०२० मधील फ्रेंच ओपन स्पर्धेत मिळवला होता. त्यानंतर, तिने २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये सलग तीन वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. याशिवाय २०२२ मध्ये तिने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. आता २०२५ मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील जेतेपदासह तिने सहाव्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली आहे.