महिला गटातील उपांत्य फेरीत पहिली लढत बेलारुसची अग्रमानांकित आर्यना संबालेंका विरुद्ध अमेरिकेची १३ वी मानांकित अमांडा अनिसिमोवा यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत स्विसची बेलिंडा बेन्सिक विरुद्ध पोलंडची इगा स्वियातेक यांच्यात सेमीची लढत पाहायला मिळणारआहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्ल्ड नंबर वन संबालेंका हिला मोठा धक्का
विम्बल्डन २०२५ च्या महिला एकेरीतील उपांत्य फेरीतील लढतीत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेच्या १३ व्या मानिंकित अमांडा अनिसिमोवा हिने बेलारुसची अग्रमानांकित आर्यना संबालेंका हिला पराभवाचा धक्का दिलाय. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतील जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली गेलेली वर्ल्ड नंबर वन संबालेंका हिला उपांत्य फेरतील ६-४, ४-६, ६-४ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
अविश्वसनीय! अमांडानं पहिल्यांदाच गाठली ग्रँडस्लॅम स्पर्धेची फायनल
अमांडा अनिसिमोवा हिने वर्ल्ड नंबर वन संबालेंका विरुद्ध २ तास ३६ मिनिटे चालेल्या लढतीत आश्चर्यकारक विजय नोंदवत पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. या विजयानंतर अनिसिमोवा म्हणाली की, अजूनही हे सत्य वाटत नाही. हा क्षण माझ्यासाठी अविश्वसनीय आहे, असे तिने म्हटले आहे. आता विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिच्यासमोर पोलंडची इगा स्वियातेकचे आव्हान असणार आहे.
सबालेंकानं गमावली विक्रमी डाव साधण्याची संधी
संबालेकानं मोठी संधी गमावल्यावर सलग आठव्यांदा विम्बल्डन महिला एकेरीत नवी सम्राज्ञी पाहायला मिळणार आहे. आर्यना सबालेंका ऑक्टोबरमध्ये इगा स्वियातेक हिला मागे टाकत महिला टेनिस क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाली होती. अमांडा अनिसिमोवा विरुद्धची उपांत्य फेरीतील लढत जिंकून सेरेना विलियम्स हिच्यानंतर सलग चार ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहचण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी तिच्याकडे होती. पण ही संधी आता हुकली आहे. गतवर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डनला मुकल्यावर संबालेंकानं अमेरिकन ओपन स्पर्धेत बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यावर आता विम्बल्डनमध्ये तिचा प्रवास उपांत्य फेरीतीच संपुष्टात आला.
ड्रिप्रेशनमुळे ब्रेक, आता ऐतिहासिक कामगिरी
अमांडा अनिसिमोवा हिने २०२३ मध्ये मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे टेनिसमधून ब्रेक घेतला होता. २०१९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिने फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीपर्यत मजल मारली होती. आता पहिल्यांदा फायनल खेळताना ती ऐतिहासिक कामगिरी नोंदवणार का ते पाहण्याजोगे असेल. अंतिम सामन्यात तिला भिडणाऱ्या इगा स्वियातेक हिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत चार वेळा फ्रेंच ओपन (२०२०, २०२२, २०२३, २०२४) आणि २०२२ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. ती पहिल्यांदा विम्बल्डनचे मैदाना गाजवण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरेल.