Devendra Fadnavis congratulates Gukesh D: भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ ( Chess Grand Master ) विश्वाचा नवा चॅम्पियन बनला. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी १२ डिसेंबरला चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. अखेर १८ वर्षीय गुकेशला विजय मिळवला. गुकेशने चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत ७.५ - ६.५ अशा फरकाने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा गुकेश हा विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेशला विजेतेपदासह १८ कोटी रुपयांचे इनाम मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुकेश याला कॉल करून त्याचे तोंडभरून कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. फडणवीस गुकेशला कॉल करून म्हणाले, "नमस्ते गुकेश! तुझ्या पराक्रमाने तू आम्हा सर्वांना खूपच आनंदी केले आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. तू ज्या वयात नावलौकिक मिळवला आहेस, त्यासाठी तुझे कौतुक वाटते. तू अतिशय कमी वयात जे यश मिळवलं आहे, त्यासाठी तुझा संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. जेव्हा तू भारतात परत येशील त्यावेळी तू नक्की महाराष्ट्रात ये. आम्हाला तुझा आदर सत्कार करायचा आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आम्हाला तुझ्या यशाचा फार आनंद आहे. ऑल द बेस्ट."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत गुकेशला शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, "भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा."