पॅरीस : यंदा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडकण्याचा मान मिळवला तो स्वित्झर्लंडच्या स्टॅनालिस वॉवरिन्का याने. त्याने फ्रान्सच्या ज्यो विल्फ्रेंड त्सोंगाचा पराभव केला. आता विजेतेपदासाठी त्याची लढत आठ वेळचा ग्रॅण्डस्लॅम विजेता सर्बियाचा नोवाक जोकोवीच आणि दोन वेळचा विजेता ब्रिटनचा अँडी मरे यांच्यातील विजेत्याशी होईल. जोकोवीच व मरे यांच्यातील दुसरा उपांत्य सामना चौथ्या सेटपर्यंत रंगला होता. जोकोवीचने पहिले दोन सेट ६-३, ६-३ असे खिशात घालत चांगली सुरुवात केली. मात्र तिसऱ्या निर्णायक सेट मरे याने ५-७ असा जिंकत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार चौथ्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबर झाली होती. पुरुष एकेरीतील ही सेमीफायनल लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. ३ तास ४६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात वॉवरिन्काने सरशी साधली. त्याने त्सोंगाचा ६-३, ६-७ (१), ७-६ (३), ६-४ अशा फरकाने पराभव केला. याआधी, दिग्गज टेनिसपटू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत वॉंवरिन्काने उपांत्य फेरीत धडक दिली. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वॉवरिन्का आता दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. याआधी, गेल्या वर्षी त्याने आॅस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. दुसरीकडे, फ्रान्सच्या त्सोंगा याला १९८३ नंतर देशाला दुसरा ग्रॅण्डस्लॅम पटकावून देण्याची संधी होती. (वृत्तसंस्था)
‘वॉव’रिन्का फायनलमध्ये!
By admin | Updated: June 6, 2015 01:10 IST