यूस्टन : सचिन तेंडुलकरच्या संघाला वॉर्न वॉरियर्स संघाविरुद्ध पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. आॅल स्टार्स टी-२० सिरिजच्या दुसऱ्या लढतीत वॉर्नच्या संघाने ५७ धावांनी सरशी साधली. या विजयासह वॉर्न वॉरियर्स संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सचिनने नाणेफेक जिंकून वॉर्न वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वॉर्न वॉरियर्सने २० षटकांत ५ बाद २६२ धावांची दमदार मजल मारली.लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन ब्लास्टर्स संघाचा डाव ८ बाद २०५ धावांत रोखल्या गेल्या. सचिन ब्लास्टर्स संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मालिकेतील तिसऱ्या व अखेरचा सामना १४ नोव्हेंबर रोजी लॉस एंजेल्समध्ये खेळल्या जाणार आहे. वॉरियर्स संघातर्फे कुमार संगकाराने ३० चेंडूंमध्ये ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी केली तर जॅक्वेस कॅलिसने २३ चेंडूंमध्ये ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४५ धावा फटकावल्या. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने १६ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. त्याने पाच चौकार व ३ षटकार ठोकले. सचिन ब्लास्टर्सतर्फे लान्स क्लुजनरने ४५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर सेहवाग, ग्लेन मॅक् ग्रा व ग्रॅमी स्वान यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्लास्टर्सतर्फे माजी भारतीय फलंदाज व संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने २० चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा फटकावल्या तर वीरेंद्र सेहवागने ८ चेंडूंमध्ये २ षटकारांसह १६ धावा केल्या.शॉन पोलॉकने २२ चेंडूंमध्ये १ चौकार व ७ षटकारांच्या वतीने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ब्रायन लाराने २१ चेंडूंमध्ये १९ तर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने १२ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या. मिनट मेड पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. वॉर्न वॉरियर्स संघातर्फे अॅण्ड्य्रू सायमन्ड््स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ७० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. सकलेन मुश्ताकने १२ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. अजित आगरकर व कॅलिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
वॉर्न वॉरियर्सची सरशी
By admin | Updated: November 12, 2015 23:23 IST