ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १४ - गुजरात लायन्स विरुद्ध शानदार शतक झळकवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी आणखी एक विक्रम मोडला. कोहली आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा विक्रम आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उथाप्पाच्या नावावर होता.
त्याने फक्त ११ डावांमध्ये हा विक्रम मोडला. उथाप्पापेक्षा पाच डाव कमी खेळत कोहलीने हा विक्रम मोडला. त्याने ५५ चेंडूत शानदार १०९ धावांची खेळी केली. आयपीएलच्या एका मोसमात तीन शतके झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना उथाप्पाने ६६० धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या एका मोसमातील भारतीय फलंदाजाने केलेल्या त्या सर्वाधिक धावा होत्या. गुजरात लायन्स विरुद्ध त्याने २४ एप्रिलला आयपीएलमधले पहिले शतक झळकवले होते. त्यानंतर काही आठवडयांच्या आत त्याने तीन शतके झळकवली आहेत. डिविलियर्स आणि कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरुने गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.