कोलकाता : ‘गेम चेंजर’ असलेला सूर्यकुमार यादव हाच मुंबई इंडियन्सवरील केकेआरच्या विजयाचा खरा शिल्पकार असल्याची प्रतिक्रिया कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केली.विजयानंतर गंभीर म्हणाला, ‘टिच्चून मारा केल्याबद्दल मोर्नी मोर्केल याची ‘सामनावीर’ म्हणून निवड जरी झाली असली तरी माझ्या मते सूर्यकुमारच सामनावीर आहे. सूर्यकुमारचे भविष्य फार उज्ज्वल आहे. नाणेफेकीपूर्वी सूर्यकुमारची कामगिरी पाहण्यासारखी असेल, असे रवी शास्त्री यांच्याकडे मी बोललो होतो. चांगली बाब अशी, की सामन्यापूर्वीच आम्ही त्याला उपकर्णधारपदी नेमले. चौथ्या स्थानावर बढतीही देण्यात आली. आमचा सर्वांचा विश्वास त्याने सार्थ ठरविला.’ संघाचा उपकर्णधार असलेल्या यादवने पाच षटकार आणि एका चौकारासह २० चेंडूंत नाबाद ४६ धावांची खेळी केली.दोनदा आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार असलेला गंभीर पुढे म्हणाला, ‘केकेआरचा विश्वास खेळाडूंची प्रतिभा शोधणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर असतो.’रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या यादवची काही सामन्यांतील खराब कामगिरीनंतर उचलबांगडी करण्यात आली होती. त्याची जागा आदित्य तारेने घेतली. या पार्श्वभूमीवर गंभीर म्हणाला, ‘आम्ही यादवमधील नेतृत्वगुण हेरले. त्याला तयार केले. आता परिणाम दिसत आहेत. केकेआर व अन्य संघांत हाच मूलभूत फरक आहे.’गोलंदाजी शैली सुधारल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सुनील नरेनला मात्र चार षटकांत एकही बळी मिळू शकला नाही. त्याने २५ धावा मोजल्या. यावर गंभीरचे मत असे की,‘नरेनवर आम्ही अतिरिक्त दडपण आणणार नाही. त्याने हळूहळू लय मिळवावी, असा आमचा हेतू आहे. काहीशा गवताळ असलेल्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारसे यश मिळत नसल्याने मी त्याच्या गोलंदाजीवर खूष आहे. आम्ही धावांचा पाठलाग करण्यात पटाईत आहोत. माझ्या सहकाऱ्यांनी नेहमीसारखी पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी बजावली. मात्र यापुढील सामन्यांत क्षेत्ररक्षणातील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाईल.’ क्षेत्ररक्षणातील हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा दमही गंभीरने सहकाऱ्यांना दिला. केकेआरचा पुढील सामना ११ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होईल.
विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार : गौतम गंभीर
By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST