बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:21 AM2018-10-23T04:21:57+5:302018-10-23T04:21:59+5:30

स्टार मल्ल बजरंग पूनिया याला जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

The ultimate solution for Bajrangi is silver | बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

Next

बुडापेस्ट : स्टार मल्ल बजरंग पूनिया याला जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या १९ वर्षीय ताकुटो ओटुगुरो याने बजरंगचे तगडे आव्हान १६-९ असे परतावत सुवर्ण पदकावर कब्जा केला. मात्र या पराभवानंतरही बजरंगची कामगिरी ऐतिहासिक ठरली असून या स्पर्धेत दोन पदक जिंकणारा पहिला भारतीय मल्ल असा पराक्रम त्याने केला आहे. याआधी २०१३ साली फ्रीस्टाइल ६० किलो वजनीगटात बजरंगने कांस्य मिळवले होते. दुसरीकडे ताकुटोनेही विक्रमी कामगिरी केली असून तो जपानचा सर्वात युवा जागतिक विजेता ठरला.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून आतापर्यंत केवळ सुशील कुमार यानेच सुवर्णपदक जिंकले आहे. दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलने २०१० साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. त्याचवेळी, यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बजरंगकडून यावर्षी जागतिक सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. यंदाच्या वर्षी बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.
चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात बजरंगने जबरदस्त खेळ करताना सुरुवातीला वर्चस्व राखले होते. मात्र, मोक्याच्यावेळी ताकुटो याने ५ गुणांची शानदार कमाई करत नियंत्रण मिळवले. त्याने सातत्याने बजरंगच्या डाव्या पायावर पकडी करत नियंत्रण मिळवले. यानंतर बजरंगनेही मुसंडी मारताना पिछाडी ४-५ अशी कमी केली. मध्यंतराला ताकुटोने ७-६ अशी एका गुणाची आघाडी मिळवली होती. यानंतर बजरंगकडून बचावामध्ये काही झालेल्या चुकांचा फायदा
घेत ताकुटोने जबरदस्त आघाडी घेताना ४ गुणांची कमाई करत
१०-६ असे वर्चस्व मिळवले. इथेच सामना बजरंगच्या हातून निसटला. यावेळी त्याने पुनरागमनाचे खूप
प्रयत्न केले, परंतु ताकुटोला मागे टाकण्यात त्याला अखेरपर्यंत यश आले नाही. (वृत्तसंस्था)
>स्पर्धेतील वाटचाल
याआधी उपांत्य फेरीत बजरंगने क्यूबाच्या एलेजांड्रो वाल्देस तोबिएर याला ४-२ असे नमवले. सुरुवातीला बजरंगने ४-१ अशी मोठी आघाडी घेतली होती, मात्र तोबिएरने पुनरागमन करत ३-४ अशी पिछाडी कमी केली.
यावेळी बजरंगने बचावावर अधिक भर देताना तोबिएरला बरोबरीची कोणतीही संधी न देत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे जपानच्या ताकुटो याने रशियाच्या अखमेद चाकाएव याचा १५-१० असा पराभव करत आगेकूच केली होती.

Web Title: The ultimate solution for Bajrangi is silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.