सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पुढील आठवड्यात रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र, त्याआधी त्याने तीन वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तो म्हणाला आहे की, अजूनही मला ऑस्ट्रेलियन विमानतळावर पोहोचल्यावर मानसिक ताण जाणवतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियात घडलेला तो प्रकार अजूनही टेनिस स्टार विसरला नाही
जोकोविचने तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन विमानतळावर आलेल्या आपल्या तणावपूर्ण अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी व्हिसा रद्द झाल्यानंतर आणि कोविड-१९ संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सज्ज असलेल्या जोकोविचनं दिला जुन्या गोष्टीला उजाळा
जोकोविचने एका मुलाखतीत म्हटले की, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, अजूनही ताण येतो. याआधी जेव्हा ऑस्ट्रेलियात आलो, तेव्हा पासपोर्ट कंट्रोलमधून जाताना त्रास झाला. त्या गोष्टीचा अजूनही थोडा ताण जाणवतो. पासपोर्ट तपासणारी व्यक्ती मला पुन्हा थांबवणार का? कस्टडीमध्ये घेणार का? की सोडून देणार? अशा भावना अजूनही मनात येतात.'
गत हंगामात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवली
कोरोना लस न घेतल्याने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियनमध्ये रोखले होते. मात्र, जोकोविचने २०२३ मध्ये मेलबर्नमध्ये पुनरागमन केले आणि दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावले.