तिरुअनंतपुरम : युवा मिडफिल्डर ओमिड पोपालजेच्या शानदार दोन गोलच्या जोरावर अफगाणिस्तानने आपली विजयी मालिका कायम ठेवताना, सॅफ फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये सोमवारी ग्रुप बी मधील लढतीत मालदिवला ४-१ असे हरवून विजयाची हॅटट्रिक नोंदविली. अफगाणिस्तान आता ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. सेमीमध्ये त्यांची लढत ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावरील श्रीलंकेशी होईल. अ गटात अव्वल संघ व सहा वेळेचा सॅफ चॅम्पियन भारत सेमीफायनलमध्ये मालदिव विरुद्ध भिडेल. दोन्ही सामने ३१ डिसेंबर रोजी होणार आहेत.केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अफगाण खेळाडूंनी पुन्हा दमदार कामगिरी केली. फैसल शायेस्ताने २0 मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर ३२व्या मिनिटाला अली फासिरने मालदिवला बरोबरी साधून दिली. दोनच मिनिटाने पापोलजने अफगाणिस्तानला पुन्हा आघाडीवर आणले. मध्यंतराला २-१ असा गुणफलक होता. यानंतर अफगाणिस्तानच्या अहमद अर्श हातिफीने ५१ व्या मिनिटाला गोल केला. पोपालजने ५४ व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल करत मालदिवच्या पुनरागमनाच्या अशा संपुष्टात आणून संघाला ४-१ असे विजयी केले.
अफगाणिस्तानची अव्वल स्थानी झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 01:21 IST