- मेरी कोम लिहिते...आॅलिम्पिकची अखेर प्रतीक्षा संपली. अन्य चॅम्पियनशिपपेक्षा पृथ्वीतलावरील ही सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा. एक बॉक्सर या नात्याने आम्ही नेहमी स्पर्धेला जातो तेव्हा स्वत:मध्ये गुंतून जातो. सराव, व्यायाम, भोजन, विश्रांंती आणि मॅचइतकेच विश्व होऊन बसते. तेच ते चेहरे पाहायला मिळतात. फिरण्याचीही अधिक संधी नसते. आपल्या खेळात हा नित्याच भाग असल्याने एक प्रकारचा कंटाळवाणा होऊन बसतो.आॅलिम्पिक मात्र वेगळे विश्व आहे. अनेक खेळातील अनेक खेळाडूंना भेटण्याचे हे स्थान आहे. यांच्यापैकी अनेकांबद्दल आपण ऐकलेले असते किंवा त्यांची कामगिरी पाहिलेली असते. अनेकांची पहिल्यांदा भेट होते. पण हे सर्व जण चॅम्पियन्स असतात. येथे त्यांच्याशी मैत्रीची, खेळाबद्दल चर्चा करण्याची त्यांच्याकडून काही ज्ञान मिळविण्याची, त्यांच्या स्पर्धाप्रकारांवर जवळून लक्ष ठेवण्याची संधी उपलब्ध होते. हेच आॅलिम्पिकचे वैशिष्ट्य आहे.लंडन आॅलिम्पिकदरम्यान चार वर्षांआधी क्रीडाग्राममध्ये भारतीय पथकासोबत थांबले असताना गगन नारंग, सुशीलकुमार, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, विजय कुमार, सानिया मिर्झा, लियांडर पेस यांच्याशी दर दिवशी गाठ पडायची. मुक्तपणे चर्चा करण्याची मुभा असायची. या चर्चेमुळे आपण अधिक सुज्ञ बनतो. शिवाय परिपूर्ण खेळाडू बनू शकतो. अन्य चॅम्पियन्स खेळाकडे कसे बघतात, त्यांची तयारी, त्यांचा आहार, स्पर्धेच्या दिवशीची वागणूक आदी पाहायला मिळते. त्यांना चिअरअप करण्याचीदेखील संधी असते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंना भेटणे सोपे नसते. क्रीडाग्राम विस्तीर्ण असते. कुठला खेळाडू कुठे थांबला आहे, याची माहिती नसल्याने हे स्टार्स बँक्वेट हॉलमध्ये दृष्टीस पडले तर आपले नशीब. येथे आहारासाठी सर्व खेळाडू एकत्र येतात. त्या वेळी कमालीचे वातावरण असते. इतरांप्रमाणे २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकवर माझेही लक्ष आहे. लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत येथे अधिक मेडल्स मिळावेत, यासाठी प्रार्थना करीत आहे. सध्या भारतात आॅलिम्पिक खेळाबद्दल बरीच जाणीव निर्माण होत आहे. या संधीचा लाभ घेत आमच्या खेळाडूंनी लंडनच्या तुलनेत अधिक पदके मिळवायला हवीत. अधिक पदके मिळावीत, यााठी माझ्यातर्फे सर्व खेळाडूंना शुभेच्छा. गेल्या काही दिवसांपासून मला वारंवार एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे रिओमध्ये भारतीय बॉक्सर्सकडून तुम्ही किती पदकांची अपेक्षा बाळगता? माझ्या खेळाचे स्वरूप वेगळे आहे. या खेळात पदकाची अपेक्षा एकदम कुणी करू शकत नाही. हा ‘नॉकआऊट’ खेळ असल्याने दुसरी संधी नाहीच! तुम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावाच लागतो. अन्यथा चार वर्षांपासून पाहिलेले स्वप्न आणि घेतलेली मेहनत अवघ्या दहा मिनिटांत मातीमोल होऊन बसते. एखादी चूक तुम्हाला आयुष्यभर महागडी ठरू शकते. याशिवाय आमच्या खेळात ड्रॉची भूमिकादेखील तितकीच मोलाची ठरते. बॉक्सरला पहिल्या फेरीचा ड्रॉ अनुकूल मिळाल्यास त्याच्याच पुढे जाण्याची जिद्द निर्माण होते, शिवाय आत्मविश्वासाची भर पडते. बॉक्सर्सबद्दल मी प्रार्थना करतेच आहे, पण त्यांना चाहत्यांचा पाठिंबादेखील हवा आहे.(टीसीएम)
बॉक्सिंगमध्ये दुसरी संधी नाहीच !
By admin | Updated: August 7, 2016 03:49 IST