कसोटीत भारत नंबर वन!
कोलकाता : तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या न्यू झीलंडचा १७८ धावांनी फडशा पाडून २-० अशी विजयी आघाडी घेतली असून, या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे वेस्ट दौऱ्यातच भारत आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आला होता. मात्र, चौथा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर याचा फायदा घेत पाकिस्तानने पहिले स्थान मिळवले. आता पुन्हा भारत अव्वल स्थानी आला आहे.या शानदार विजयासह भारताने घरच्या मैदानावर गेल्या १२ सामन्यांतून ११वा विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णीत खेळला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या यजमानांचा डाव गडगडल्यानंतरही किवी संघाला फायदा घेता आला नाही. भुवनेश्वर आणि शमी यांच्या स्विंग व वेगवान माऱ्यापुढे किवी संघाने पहिल्या डावात सपशेल शरणागती पत्करली. तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अश्विन व जडेजा यांनी आपला जलवा दाखवताना न्यू झीलंडचा पराभव निश्चित करत भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले. 2003सालापासून आयसीसी क्रमवारी सुरू झाल्यानंतर चौथ्यांदा टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले. आतापर्यंत चार यष्टीरक्षकांनी एकाच सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. यामध्ये वृद्धिमान साहा, एम.एस. धोनी, फारूख इंजिनीअर व दिलवार हुसैन यांचा समावेश आहे. धोनीने अशी कामगिरी चार वेळा केली असून, इतर खेळाडूंनी केवळ एकदा अशी कामगिरी केली आहे.रँकिंग आमच्या नियंत्रणातकामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य आहे. रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणे आणि गमावणे आमच्या हातात नाही; पण मायदेशातील प्रदीर्घ सत्रामुळे यावर नियंत्रण राखणे शक्य आहे.- विराट कोहलीया सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 26 बळी घेतले. वेगवान गोलंदाजांची इडन गार्डनवरील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी....तर शर्यतीत पाकिस्तान पडणार खूप मागे भारताने इंदोर कसोटी जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखल्यास अव्वल स्थानाच्या शर्यतीत पाकिस्तान खूप मागे पडणार. याआधी भारत नोव्हेंबर २००९ ते आॅगस्ट २०११, फेब्रुवारी २०१६ आणि आॅगस्ट २०१६मध्ये अव्वल स्थानी होता.या सामन्यात एकूण १५ फलंदाज पायचीत झाले. भारतात खेळलेल्या कसोटी सामन्यात ही सर्वोच्च संख्या आहे. याआधी १९९६ साली अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात १३ फलंदाज पायचीत झाले होते.