सिंगापूर : रात्रभर जागरण झाल्यानंतर डोळ्यांवर आलेल्या थकव्यानंतरही भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेश याने अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी घेत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्याने शेकडो स्वाक्षऱ्या केल्या आणि त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी अखेर त्याने आपल्या स्वप्नातील ट्रॉफी उचलली.
१८ वर्षीय गुकेशने गुरुवारी चीनच्या डिंग लिरेनला नमवून ऐतिहासिक यश मिळवताना बुद्धिबळ विश्वातील सर्वांत युवा विश्वविजेता बनण्याचा पराक्रम केला. यासह तो एकूण १८वा, तर केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळ विश्वविजेता बनला. गुकेशने या विजेतेपदासह १.३ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ११.०३ कोटी रुपये) इतकी कमाईही केली. शुक्रवारी सकाळी गुकेशने या शानदार ट्रॉफीची झलक पाहिली. मात्र, त्यावेळी त्याने या ट्रॉफीला स्पर्श करण्यास नकार दिला, कारण त्याला संध्याकाळच्या समारोहाची प्रतीक्षा होती. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) अध्यक्ष अर्काडी ड्वोर्कोविच यांनी गुकेशला विश्वविजेतेपदाची ट्रॉफी प्रदान केली.याआधी, गुकेश आपल्या चाहत्यांशी भेटण्याकरता आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी बसला. यावेळी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींमध्ये गुकेशला भेटण्यासाठी चढाओढ रंगली होती.
५ कोटी रुपयांचे बक्षीसचेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी बुद्धिबळ विश्वातील सर्वांत युवा विश्वविजेता डी. गुकेश याच्या यशाचा आनंद व्यक्त करताना त्याच्यासाठी पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ‘सर्वांत कमी वयाच्या विश्वविजेत्या डी. गुकेशच्या यशाचा सन्मान करण्यासाठी मला पाच कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करताना आनंद होत आहे. त्याचे ऐतिहासिक यश देशासाठी गर्वाची बाब ठरली आहे. तो भविष्यातही चमकत राहील आणि नवे यश मिळवत राहील.’
हा असा क्षण आहे, जणू मी हा लाखोवेळा जगलो आहे. प्रत्येक सकाळी मला याच कारणामुळे जाग येत होती. ही ट्रॉफी हाताळणे माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. हा प्रवास कोणत्याही स्वप्नाहून कमी नाही. यामध्ये अनेक चढ-उतार आले, अनेक आव्हाने आली. जेव्हा मला समाधान मिळत नव्हते, तेव्हा देवाची मला साथ मिळाली आणि मार्ग सापडला. - डी. गुकेश, विश्वविजेता बुद्धिबळपटू
सर्वोच्च शिखर गाठले : कास्पारोव्ह'टीकाकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मागील कोणताही सामना चुकांविना पूर्ण झालेला नाही. गुकेशने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे,' असे सांगत रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याने भारताचा युवा विश्वविजेता डी. गुकेशचे कौतुक केले.
टीकांकडे दुर्लक्ष कर : विश्वनाथन आनंदजागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ सामन्याच्या स्तरावरून होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष कर. या क्षणाचा आनंद घे. कारण, टीका कायम यशासोबतच होते, असा मोलाचा सल्ला भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आणि पाचवेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने नुकताच विश्वविजेता बुद्धिबळपटू बनलेल्या डी. गुकेश याला दिला आहे. आनंदने म्हटले की, मला खूप आनंद झाला आहे. मी गुरुवारी खरेच इतिहास रचला जात असल्याचे पाहिले. अशा प्रकारची टीका प्रत्येक सामन्यानंतर होत असते. प्रामाणिकपणे सांगायचे तर, याकडे गुकेशने दुर्लक्ष करावे. गुकेशचे यश, त्याची योग्यता याबाबत सर्वांना माहिती आहे.