इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आठ आॅक्टोबरपासून होळकर स्टेडियमवर तिसरा व अखेरचा कसोटी सामना जिंकून किवींना क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने खेळेल. विशेष म्हणजे, होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, याआधी झालेल्या चारही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत भारताचा विजय झाला असून याच मैदानावरील पहिली कसोटी जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.एप्रिल २००६ मध्ये भारत - इंग्लंड सामन्याद्वारे होळकर स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत चार एकदिवसीय सामने झालेल्या या स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळविण्यात येईल. कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर भारताने आपला ५०० वा कसोटी सामना खेळताना न्यूझीलंडला १९७ धावांनी नमवले. यानंतर कोलकाता इडनगार्डन येथे घरच्या मैदानावर २५० वा सामना खेळताना न्यूझीलंडला १७८ धावांनी पराभूत करून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. याचबरोबर भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्येही अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, होळकर स्टेडियमवरील आपला शंभर टक्के निकाल कायम राखून अंतिम कसोटी विजयासह न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन आपले नंबर वन स्थान अधिक भक्कम करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि टीम सज्ज आहे.त्याचप्रमाणे, कर्णधार कोहलीला आणखी एक पराक्रम करण्याची संधी होळकर मैदानावर असेल. हा सामना जिंकल्यास भारत पहिल्यांदाच न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यात यशस्वी होईल. याआधी भारताने कर्णधार मन्सूरअली खान नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली १९६७-६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली होती. त्या वेळी पहिल्यांदाच भारताने न्यूझीलंडविरुद्ध एका मालिकेत तीन सामने जिंकले होते. भारताला आयसीसी क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखण्यासाठी इंदूर येथील कसोटी सामना जिंकावा लागेल किंवा अनिर्णीत राखावा लागेल. जर, अशी कामगिरी करण्यात भारताला यश आले, तर नंबर वन स्थान पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर जाईल. मालिकेत ३-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११५ गुण होतील. तर, २-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११३ गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने वेस्ट इंडिजला नमवण्यात यश मिळवले तरी त्यांना ११२ गुणांपर्यंतच समाधान मानावे लागेल. त्याचवेळी न्यूझीलंडने अखेरच्या कसोटीमध्ये बाजी मारल्यास भारताचे १११ गुण होतील आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडे पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज करण्याची संधी असेल. (वृत्तसंस्था)गुरुवारी निवडला जाणार भारतीय वनडे संघएम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती न्यूझीलंडविरुद्ध आगामी ५ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची निवड करणार आहे.च्भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवीन सिनिअर निवड समितीने गुरुवारी दुपारी ४ वाजता आपली बैठक आयोजित केली आहे आणि सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषदेत संघाची घोषणा प्रसाद करणार आहेत.च्भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान इंदूर येथे होणार आहे. त्यानंतर ५ वनडे सामन्यांची मालिका होईल. पहिला वनडे सामना १६ आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे, दुसरा वनडे २० आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे, तिसरा वनडे सामना २३ आॅक्टोबरला मोहाली येथे, चौथा वनडे सामना रांची येथे २६ आॅक्टोबर रोजी व पाचवा वनडे सामना २९ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणम् येथे खेळवला जाईल.
टीम इंडिया अपराजित
By admin | Updated: October 6, 2016 04:43 IST