विशाखापट्टणम : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्याच दिवशी आज, शनिवारी कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या पहिल्या डावातील ८८ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना तामिळनाडूने शुक्रवारी दिवसअखेर ४ बाद १११ धावांची मजल मारली होती. तामिळनाडूचा पहिला डाव १५२ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात तामिळनाडू संघाने ६४ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूने आज केवळ ४१ धावांची भर घालत ६ विकेट गमावल्या. तामिळनाडूतर्फे विजय शंकरने सर्वाधिक ३४ धावा फटकावल्या तर दिनेश कार्तिकने ३१ धावांची खेळी केली. कर्नाटकतर्फे श्रीनाथ अरविंदने १६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रेयस गोपाल व कर्णधार आर. विनयकुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. कर्नाटकच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष छाप सोडता आली नाही. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने ७७ धावांची खेळी केली तरी कर्नाटकचा डाव ३८.१ षटकांत १५० धावांत संपुष्टात आला. कर्नाटकतर्फे विग्नेशने ५३ धावांत ४ तर टी. नटराजनने ४० धावांत ३ बळी घेतले. कर्नाटकने दिलेल्या ८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची ३ बाद ३५ अशी अवस्था झाली होती. पण दिनेश कार्तिकच्या (नाबाद ४१ धावा, ३० चेंडू, ५ चौकार, २ षटकार) आक्रमक खेळीच्या जोरावर तामिळनाडू संघाने १९.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. (वृत्तसंस्था)
तामिळनाडू उपांत्य फेरीत
By admin | Updated: December 25, 2016 03:44 IST