नवी दिल्ली : तो तीन वर्षांचा असेल तेव्हा वडिलांचे निधन झाले. आई आयुर्विमा एजंट. मुलाचा खेळ बहरावा, प्रगतीच्या वाटा मोकळ्या व्हाव्यात यासाठी मदुराई सोडून भारतीय बुद्धिबळाची राजधानी असलेल्या चेन्नई शहरात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. वाटचालीत अनेक अडथळ्यांवर मात करीत २५ वर्षांचा अरविंद चिदंबरम अखेर या खेळात चॅम्पियन बनला. जागतिक बुद्धिबळात डी. गुकेश आणि रमेशबाबू प्रज्ञानानंद यांच्या तुलनेत थोडे उशिरा नावारूपास आलेल्या या खेळाडूला अखेर परिश्रमाचे फळ मिळाले.
अरविंद हा विश्व चॅम्पियन गुकेशच्या वेल्लामल स्कूलचाच वरिष्ठ विद्यार्थी, प्रागमधील जेतेपदामुळे त्याला ग्रॅन्ड बुद्धिबळ टूरचे वाइल्ड कार्ड मिळाले. विश्व क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंना या स्पर्धेत स्थान दिले जाते; पण अरविंदला मे मध्ये होणारी शारजा मास्टर्स आणि जुलैमधील बील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आमंत्रण मिळाले आहे. अरविंदला चोलामंडल समूहाने आर्थिक बळ दिले आहे.
मागे वळून पाहिले तर २०१३ला चेन्नईत विश्वनाथन आनंदने मॅग्नस कार्लसनविरुद्ध विश्वविजेतेपद गमावले त्याचवेळी शालेय विद्यार्थी असलेल्या अरविंदने याच शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याला याच स्पर्धेत पहिला जीएम नॉर्म मिळाला.
२०१५ ला तो ग्रॅन्डमास्टर बनला. २०१९ ला क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारात त्याने इंडियन ओपन स्पर्धा जिंकून अशी आगळीवेगळी किमया साधणारा तो पहिला भारतीय ठरला होता. मागच्या नोव्हेंबरमध्ये त्याने चेन्नई ग्रॅन्डमास्टर्स स्पर्धा जिंकून २७०० ईएलओ रेटिंग पूर्ण केले. प्राग मास्टर्स जिंकून अरविंदने गुकेश, अर्जुन आणि प्रज्ञानानंद यांच्यानंतर भारतीय बुद्धिबळातील आपण चौथा स्तंभअसल्याचे दाखवून दिले. अरविंद सध्या लाइव्ह विश्व क्रमवारीत १४ व्या आणि भारतात चौथ्या स्थानावर आहे.