नवी दिल्ली : बलाढ्य रेल्वे संघाने अपेक्षित कामगिरी करताना नुकत्याच झालेल्या ६०व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात सांघिक विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी सेनादल संघाने ग्रीको रोमन प्रकारामध्ये दबदबा राखला. तर हरियाणाने महिला गटात वर्चस्व राखताना १८व्या सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष फ्रीस्टाईल प्रकारात रेल्वेने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर कब्जा करताना आपला दबदबा कायम राखला. या गटात हरियाणा आणि सेनादल यांना गतस्पर्धेप्रमाणेच अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रीको रोमन प्रकारामध्ये मात्र सेनादलाने आपले गतविजेतेपद कायम राखले. यामध्ये हरियाणा संघाने द्वितीय तर बलाढ्य रेल्वेने तृतीय स्थान पटकावले. तर महिलांमध्ये हरियाणाने निर्विवाद वर्चस्व राखले. या गटात रेल्वेने द्वितीय व उत्तर प्रदेशने तृतीय स्थान पटकावले.रेल्वे स्पोटर््स प्रमोशन बोर्डने (आरएसपीबी) तब्बल २४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रीय कुस्तीचे यजमानपद भूषविले. पुरुषांच्या फ्रीस्टाईलमध्ये रेल्वेच्या राहुल आवारे (६१ किलो), बजरंग पूनिया (६५ किलो), सत्यव्रत कादियान (९७ किलो) व सुमीत (१२५ किलो) यांनी सुवर्ण कमाई केली. उत्तर प्रदेशच्या संदीप तोमर (५७ किलो), सेनादलाच्या विनोद कुमार (७० किलो), हरियाणाचा जितेंद्र (७४ किलो) व सोमवीर (८६ किलो) यांनीही सुवर्ण पटकावले. ग्रीको रोमनमध्ये सेनादलाच्या गौरव शर्मा (५९ किलो), दीपक (६६ किलो), शोबिन कुमार (८५ किलो) व नवीन (१३० किलो) यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)महिलांमध्ये हरियाणाची रितू फोगट (४८ किलो), प्रियंका (५५), अनिता (६३) यांनी बाजी मारली. रेल्वेची विनेश फोगट (५३), सरिता (५८), साक्षी मलिक (६०), नवजोत कौर (६९), किरण (७५) यांनीही लक्ष वेधले.
बलाढ्य रेल्वेचे सांघिक विजेतेपद कायम
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST