ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - चेन्नई सुपर किंग्जची मालकी व आयपीएल फिक्सिंग प्रकरणामुळे गोत्यात आलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आता नवीन वादात अडकले आहे. श्रीनिवासन यांनी लंडनमधील खासगी कंपनीच्या मदतीने बीसीसीआयच्या पदाधिका-यांवर पाळत ठेवल्याचा आरोप असून याप्रकरणी बीसीसीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एन. श्रीनिवासन बीसीसीआच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी लंडनमधील खासगी कंपनीला १४ कोटी रुपये दिले होते. संबंधीत कंपनीने बीसीसीआयच्या पदाधिका-यांचे ईमेल व फोन कॉलवर पाळत ठेवली होती अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे पैसे बीसीसीआयच्या खात्यातूनच देण्यात आल्याने श्रीनिवास वादाच्या भोव-यात सापडले आहे. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या कोणत्या पदाधिका-याने हा निर्णय घेण्यात मदत केली याचाही शोध सुरु आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार असून ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल असे समजते.
नवनिर्वाचित अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पाळत प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता होती. बैठकीत या विषयावर चर्चा झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.