कोलंबो : वेस्ट इंडीजने मालिकेतून माघार घेतल्यानंतर अल्पावधीत भारताविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका खेळण्यास सहमती दर्शविणाऱ्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (बीसीसीआय) नवा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील वर्षी श्रीलंकन संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार होता. या दौऱ्याचे यजमानपद आता लंकेला हवे आहे. तसा प्रत्रव्यवहार त्यांनी बीसीसीआयशी केला आहे. श्रीलंका बोर्डाचा अधिकारी म्हणाला, की आम्ही १ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत सहभागी होण्यास होकार दिला आहे. आम्ही पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहोत. याबाबतची चर्चा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आताच या मालिकेबाबत सांगणे घाईचे ठरेल.पूर्वघोषित भविष्य दौरा कार्यक्रमानुसार श्रीलंका संघ आॅगस्ट २०१५ मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार होता. पण आता श्रीलंका बोर्ड या मालिकेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून ८० लाख डॉलर्सची कमाई अपेक्षित आहे. भारतीय बोर्डाकडून अद्याप या मालिकेबाबत सूचना मिळालेली नाही. मंगळवारी होणाऱ्या कार्यकारी समितीच्या तातडीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विंडीज संघाने दौरा अर्धवट सोडल्यामुळे या बैठकीचे आयोजन केले आहे. (वृत्तसंस्था)
लंकेला हवे कसोटी मालिकेचे यजमानपद
By admin | Updated: October 20, 2014 05:01 IST