ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला आहे. सावध सुरुवात करणा-या दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत परतले आहेत. डीएन एल्गार (१७), बावुमा (२२), कर्णधार हाशिम अमला (३) , जेपी डयुमिनी (१) आणि फा डु प्लेसिस भोपळाही न फोडता तंबूत परतला. रविंद्र जाडेजाने तीन आणि उमेश यादवने दोन गडी बाद केले.
भारताने ७ बाद २३१ वरून दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्य रहाणेने चिवट खेळी करून भारतीय मैदानावर शानदार शतक झळकावले, त्याला अश्विनचीही चांगली साथ मिळाली. मात्र १२७ धावांवर खेळताना रहाणे इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताची स्थिती ८ बाद २९६ अशी झाली होती. त्यानंतर आर. अश्विनने अर्धशतकी खेळी करत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र भारताच्या ३३४ धावा झालेल्या असताना अश्विनच्या रुपाने (५६) नववा गडी बाद झाला आणि त्यापाठोपाठ इशांत शर्मा (०) भोपळाही न फोडता तंबूत परतला आणि भारताचा डाव ३३४ धावांवर आटोपला.