नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावित इतिहास नोंदवणारी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पुसारला व्यंकट सिंधू गुरुवारी जाहीर झालेल्या विश्व बॅडिमंटन क्रमवारीत दहाव्या स्थानी कायम आहे तर पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत एका स्थानाची प्रगती करताना दहाव्या स्थानी दाखल झाला आहे. सिंधूचे ६३०९९ मानांकन गुण आहेत तर तिच्यापेक्षा एका स्थानाने वर असलेल्या सायनाचे ७०२०९ मानांकन गुण आहेत. सिंधूला अंतिम फेरीत पराभूत करीत सुवर्णपदक पटकावणारी स्पेनची कॅरालिना मारिन ८३६८० मानांकन गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. रिओमध्ये उपांत्य फेरी गाठणारी चीनची ली जुईरुई दुसऱ्या व जपानची नोजोमी ओकुहारा तिसऱ्या स्थानी आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीला चार स्थानांचे नुकसान सोसावे लागले असून भारतीय जोडी २६ व्या स्थानी आहे. रिओमध्ये उपांत्यपूर्व फेरीत लिन डॅनविरुद्ध पराभव स्वीकारणारा श्रीकांत ५३८८६ मानांकन गुणांसह १० व्या स्थानी आहे. भारताचा तो आघाडीचा बॅडमिंटनपटू आहे. त्यानंतर अजय जयरामने एका स्थानाने प्रगती करताना २१ वे स्थान पटकावले आहे. एच.एस.प्रणय याला तीन स्थानांचे नुकसान सोसावे लागले असून तो ३७२०१ मानांकन गुणांसह ३१ व्या स्थानी आहे. मलेशियाचा ली चोंग वेई अव्वल स्थानी कायम असून रिओ पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावणारा चीनचा चेन लोंग दुसऱ्या स्थानी कायम आहे. चीनचा लिन डॅन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुरुष दुहेरीत भारतीय जोडी बी. सुमित रेड्डी व मनू अत्री २१ व्या स्थानी कायम आहे. (वृत्तसंस्था)>विश्व बॅडमिंटन महासंघातर्फे (बीडब्ल्यूएफ) जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये दुखापतीमुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये साखळी फेरीत बाद झालेल्या सायना नेहवालला चार स्थानांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तिची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. सायनाच्या गुडघ्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती सध्या विश्रांती घेत आहे.
सिंधू व श्रीकांत दहाव्या स्थानी
By admin | Updated: August 26, 2016 03:27 IST