नवी दिल्ली : राजीव गांधी खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सानिया मिर्झा हिच्या नावाची मंगळवारी शिफारस करण्यात आली असून, यासाठी नामनिर्देशित झालेली लिएंडर पेसनंतर ती दुसरी टेनिसपटू आहे.जागतिक टेनिस क्रमवारीत दुहेरीत अव्वल स्थानावर सानियाने स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस हिच्यासोबत विम्बल्डन दुहेरीचे जेतेपद पटकावीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. पेसने अटलांटा आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याला १९९६ साली खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. करिअरमध्ये तीन मिश्र ग्रॅन्डस्लॅम विजेती सानियाने खेलरत्नच्या चढाओढीत स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लिकल, थाळीफेकपटू विकास गौडा, धावपटू टिंटू लुका, बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि हॉकी कर्णधार सरदारसिंग यांना मागे टाकले. व्यावसायिक टेनिसमध्ये प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या सानियाने द. कोरियाच्या इंचियोन शहरात २०१४ आशियाडमध्ये मिश्र दुहेरीचे सुवर्ण तसेच महिला दुहेरीचे कांस्यपदक जिंकले होते. (वृत्तसंस्था)
सानियाचे नाव ‘खेलरत्न’साठी निश्चित
By admin | Updated: August 12, 2015 04:23 IST