पॅरीस : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली भारताची फुलराणी साईना नेहवालचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत तिला थायलंडच्या रतनाचोक इंतानोन हिच्याकडून सरळसेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तिच्या पराभवामुळे भारताचेदेखील या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. एस. एस. प्रणय, अजय जयराम, ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा यांना या सुपर सिरीज स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नेहवालच्या रूपाने भारताला किताबाची आशा होती. सायनाने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या जपानच्या मिनात्सु मितानीचा २१-१९, २१-१६ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत साईनाला थायलंडच्या आठव्या मानांकित इंतानोन हिच्याकडून ९-२१, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. साईनाला यापूर्वी झालेल्या जपान व डेन्मार्क ओपनमध्ये देखील फारशी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या एनजी का लोंग एंगुसने प्रणयचा २१-१५, २१-१० ने पराभव केला. दोनदा डच ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या जयराम यालाही दुसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. जयरामला चीनच्या तियान हुवेईविरुद्ध १८-२१, ८-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. ज्वाला व अश्विनी जोडीला नेदरलँडच्या एफजी मुस्केन्स व सेलेना पीक यांच्याविरुद्ध १५-२१, १८-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
साईना पराभूत
By admin | Updated: October 24, 2015 04:21 IST