दुबई : कोलकाता कसोटी भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजयी करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या रिद्धिमान साहा आणि रोहित शर्मा यांनी आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली. त्याचवेळी अव्वल १० स्थानांमध्ये अद्यापही एकाही भारतीय फलंदाजाला प्रवेश करता आलेला नाही.साहाने या सामन्यात दोन्ही डावांत अर्धशतक झळकावताना अनुक्रमे ५४ व ५८ धावांची खेळी केली. तर, रोहितने दुसऱ्या डावात निर्णायक ८२ धावा करताना संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. साहाला या कामगिरीचा चांगलाच फायदा झाला असून, त्याने १८ स्थानांनी मोठी झेप घेताना ५६व्या स्थानी उडी मारली. त्याचवेळी रोहितने १४ स्थानांनी झेप घेत ३८वे स्थान पटकावले.मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजारालाही फायदा झाला असून, त्याने एका क्रमांकाने प्रगती करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथसह संयुक्तपणे १५ वे स्थान काबीज केले. गोलंदाजांच्या क्रमवारीत रविचंद्र आश्विन आणि रवींद्र जडेजा भारताच्या रूपाने अव्वल १०मध्ये आहेत. मात्र, आश्विनची एका स्थानाने तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून, जडेजाने एका स्थानाचा फायदा घेत सहावा क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे सामन्यात एकूण ६ किवी फलंदाज बाद केलेल्या भुवनेश्वर कुमारने ९ क्रमांकाची झेप घेत २६वे स्थान पटकावले. तर, दोन्ही डावांत प्रत्येकी ३ बळी घेतलेला मोहम्मद शमी २३व्या स्थानी पोहोचला आहे. त्याचप्रमाणे रविचंद्रन आश्विन अष्टपैलूच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननेही आपले अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. (वृत्तसंस्था)
साहा, रोहितची मोठी झेप
By admin | Updated: October 5, 2016 04:02 IST