बंगळुरू : एबी डिव्हीलियर्स (५७) आणि युवा सरफराज खान (४५) यांच्या तडाख्याच्या जोरावर विजयी हॅट्ट्रीकच्या प्रयत्नात असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या पदरी अखेर पावसामुळे निराशा आली. पहिल्या डावात राजस्थानसमोर २०१ धावांचे तगडे ‘चँलेंज’ ठेवल्यानंतर पावसाने तुफानी खेळी करीत उर्वरीत सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ दिला नाही. यामुळे सामना रद्द करण्यात आला व दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून देण्यात आला. डिव्हिलियर्सने ४५ चेंडूंत ९ चौकार आणि एक षटकार ठोकत ५७ धावा केल्या. तर सर्फराजने २१ चेंडूत ६ चौकार व एका षटकाराने ४५ धावांचा तडाखा दिला. राजस्थानकडून टिम साऊदीने दोन बळी घेतले.गत सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्यसचा कर्णधार शेन वॉटसनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. वॉटसनचा हा निर्णय सलामी गोलंदाजी टीम साउदीने यशस्वी ठरवला. त्याने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला तंबूत पाठवले. गेलने साउदीच्या ३ चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार खेचत आक्रमक पवित्रा घेतला होता.त्यानंतर कर्णधार विराट कोहली यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. सलग दोन दिग्गज तंबूत परतल्याने बंगळुरु २.२ षटकांत २ बाद १९ अशा अडचणीत आले. डिव्हिलियर्स आणि मनदीप सिंग या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अवघ्या ३४ चेंडूंत त्यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. बिन्नीने ही जोडी फोडताना मनदीपला पायचित पकडले. मनदीपने २० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. एका बाजूने डिव्हिलियर्स खंबीरपणे खेळत होता. दिनेश कार्तिकसोबत डिव्हिलियर्सने ३१ धावांची भागीदारी केली. सॅमसनच्या उत्कृष्ट थ्रोवर डिव्हिलियर्स बाद झाला. त्याची ५७ धावांची खेळी संपुष्टात आली. दिनेश कार्तिकसुद्धा (२७) धावबाद झाला. यानंतर सर्फराजने राजस्थानची बेदम धुलाई केली. कोनतेही दडपण न घेता त्याने २१ चेंडूंत नाबाद ४५ धावांची आतषबाजी करताना यजमानांना आव्हानात्मक मजल मारुन दिली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआरसीबी : गेल झे. हुड्डा गो. साऊदी १०, कोहली झे. सॅमसैन गो. साऊदी १, डिव्हीलियर्स धावबाद (हुड्डा/सॅमसैन) ५७, मनदीप पायचीत गो. बिन्नी २७, कार्तिक धावबाद (सऔदी/ सॅमसैन) २७, सरफराज नाबाद ४५, वाएसे झे. साऊदी गो. कुलकर्णी ११, हर्षल धावबाद (रहाणे/सॅमसैन) ६. अवांतर - १६. एकूण: २० षटकांत ७ बाद २०० धावा. गोलंदाजी: साऊदी ४-०-३२-२; कुलकर्णी ४-०-३६-१; फॉल्कनर २-०-२६-०; वॉटसन ३-०-२७-०; तांबे ३-०-३९-० ; बिन्नी ४-०-३२-१.
रॉयल ‘चॅलेंज’ पावसाने थोपवले
By admin | Updated: April 30, 2015 01:30 IST