नवी दिल्ली : डोपिंगच्या संकटापुढे नांगी टाकण्याची गरज नाही. उलट अॅथलेटिक्सला स्वच्छ, पारदर्शी बनविण्याची हीच योग्य संधी असल्याचे मत लांब पल्ल्याचा दिग्गज धावपटू इथिओपियाचा हेल गॅब्रेसिलासी याने व्यक्त केले आहे.रविवारी राजधानीत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला १९९६ च्या अटलांटा तसेच २००० च्या सिडनी आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता गॅब्रेसिलासी म्हणाला, ‘रशियात घडलेल्या डोपिंग कांडानंतरही अॅथलेटिक्स आणखी भक्कम वाटचाल करेल, असा विश्वास आहे. रशियातील मोठ्या प्रमाणावर डोपिंगचा खुलासा होणे हे वाईट व चांगलेदेखील म्हणावे लागेल. वाईट यासाठी की जे डोपिंग करतात त्यांना धडकी भरेल आणि खेळ स्वच्छ करण्यास मदत होईल. चांगले यासाठी की यामुळे पारदर्शीपणा वाढीस लागणार आहे. अॅथलेटिक्स महासंघाने संधीचा लाभ घ्यायलाच हवा.’नवी दिल्ली मॅरेथॉनला माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखविणार आहे. सचिनला तू ओळखतोस का, असा गॅब्रेसिलासीला सवाल करताच तो म्हणाला, ‘सचिन देशात दिग्गज व्यक्ती असून तितकाच चांगला माणूस असल्याचे मला माहीत आहे. इथिओपियात ‘अॅथलेटिक्स क्रेझी’ लोक आहेत. मी क्रिकेटचा चाहता नाही पण एकदा सचिनची मॅच बघितली. तो वेगवान धावा काढतो हे पाहून चकित झालो.’
अॅथलेटिक्सला स्वच्छ बनविण्याची हीच योग्य वेळ : गॅब्रेसिलासी
By admin | Updated: February 25, 2017 01:25 IST