मॉस्को : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी प्रतिस्पर्धी असलेल्या इस्राइलच्या बोरिस गेलफंडला भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने नमविले. या शानदार विजयासह आनंदने १०व्या ताल स्मृती स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जबरदस्त पुनरागमन केले. याआधीच्या फेरीमध्ये आनंदला रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनिकविरुद्ध तब्बल आठ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आनंदसाठी हा विजय एकप्रकारे आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. विशेष म्हणजे, रविवारी झालेल्या या पाचव्या फेरीत केवळ आनंद - गेलफंड यांचाच सामना निकालीत लागला. त्याचवेळी, नेदरलँडच्या अनिष गिरी याने रशियाच्या इयान नेपोमनियाची विरुद्धची लढत अनिर्णित राखून आपले अग्रस्थान कायम राखले. त्याचप्रमाणे रशियाचा पीटर स्विडलर आणि अजरबैजानचा शखरियार मामेदयारोव यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली. स्पर्धेत चार फेऱ्या शिल्लक असताना, गिरी चार गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे, तर नेपोमनियाची त्याच्याहून अर्ध्या गुणाने कमी असून दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर, आनंद आणि चीनचा ली चाओ प्रत्येकी ३ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. अरोनियन, क्रॅमनिक आणि मामेदयारोव प्रत्येकी २.५ गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत. तसेच, आनंदकडून पराभूत झालेला गेलफंड केवळ अर्धा गुणासह १० खेळाडूंच्या या स्पर्धेत तळाला आहे. (वृत्तसंस्था)
आनंदचे पुनरागमन
By admin | Updated: October 3, 2016 06:09 IST