गोव्याचा रणजी संघ जाहीर
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
स्वप्नील अस्नोडकरकडे नेतृत्व
गोव्याचा रणजी संघ जाहीर
स्वप्नील अस्नोडकरकडे नेतृत्वपणजी : देशातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी चषकासाठी गोव्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ पहिल्या दोन सामन्यांत प्रतिनिधित्व करेल. या संघाचे नेतृत्व स्वप्नील अस्नोडकरकडे सोपविण्यात आले आहे. स्वप्नील अस्नोडकरकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नुकताच झालेल्या विजय हजारे चषकात गोव्याने उत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरीची त्यांची थोडक्यात संधी हुकली असली तरी त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या चषकात गेल्या दोन सामन्यांत मात्र स्वप्नील अपयशी ठरला होता. २० नोव्हेंबर रोजी ओडिशाविरुद्धच्या सामन्यात स्वप्नीलने ८, तर १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शून्य धावा केल्या होत्या. असे असतानाही एक अनुभवी खेळाडू तसेच रणजी क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी याच्या जोरावर त्याला नेतृत्वाची संधी मिळाली आहे. अमोघ देसाई, सगुण कामत, रोहित अस्नोडकर आणि सूरज डोंगरे या फलंदाजांवर गोव्याची बरीच आशा आहे. दरम्यान, रणजी संघाची निवड मयूर सावकर, शरद पेडणेकर, सी. अशोक, राजन कांबळी आणि जयेश शेी या निवड समितीने केली आहे. संघ पुढीलप्रमाणे : स्वप्नील अस्नोडकर (कर्णधार), अमोघ देसाई, सगुण कामत, रोहित अस्नोडकर, रोहन बेळेकर, सूरज डोंगरे, किनन वाझ, राहुल केणी, दर्शन मिशाळ, अमित यादव, शदाब जकाती, सौरभ बांदेकर, रॉबिन डिसोझा, हर्षद गडेकर, गौरीश गावस. (क्रीडा प्रतिनिधी)