मुंबई, दि. 9 - आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत नितीश राणा आणि हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी केलेली तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने कोलकाता नाइटरायडर्सवर 4 गडी राखून मात केली. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा पहिला विजय ठरला आहे.
179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल (30) आणि जोस बटलर (28) यांनी मुंबईला जोरदार सुरुवात करून दिली. पण दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव कोलमडला. पण शेवटच्या षटकांमध्ये नितीश राणा (29 चेंडूत 50 धावा) आणि हार्दिक पांड्या (11 चेंडूत नाबाद 29 धावा) यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने शेवटच्या षटकात कोलकात्याला 4 गडी राखून मात दिली.
तत्पूर्वी चांगल्या सुरुवातीनंतर मधली फळी कोलमडलेल्या कोलकात्याला मनिष पांडेने 81 धावांची खेळी करत 178 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर गौतम गंभीर आणि ख्रिस लिन यांनी संघाला चांगली सुरुवात देताना चार षटकात 44 धावा फटकावल्या. पण गंभीर (19) बाद झाल्यानंतर उथप्पा (4), ख्रिस लिन (32) आणि युसूफ पठाण (6) हे ठराविक अंतराने माघारी परतल्याने कोलकात्याची अवस्था 4 बाद 87 अशी झाली.
अशा परिस्थितीत मनीष पांडेने तळाच्या फलंदाजांच्या साथीने मोर्चा सांभाळला. मनीष पांडेने 47 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 81 धावा कुटत कोलकाता नाइटरायरडर्सला 20 षटकात 7 बाद 178 धावांपर्यंत मजल मारून दिली.