ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - आघाडीचे फलंदाज झटपट बाद होत असताना मधल्या फळीतील अजिंक्य रहाणेने एकाबाजूने नाबाद ८९ धावांची दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला. दिवसाखेर भारतने ७ फलंदाजाच्या मोबदल्यात २३१ धावा केल्या आहेत. रहाणे(८९) आणि आर अश्विन (६) धावांवर नाबाद आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. आफ्रिकेकडून पीएटने ४ तर, अॅबॉटने ३ गडी तंबूत पाठवले. विजय (१२), धवन (३३) ,पुजारा (१४) , कर्णधार कोहली (४४), वृध्दीमान सहाची (१), रविद्रं जडेजा(२४) आणि रोहित शर्मा (१२) हे फलंदाज स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी रहाणे आणि अश्विनला खेळपट्टीवर उभे राहावे लागेल.
चौथी कसोटी जिंकून मालिकेत ३-० असा मोठा विजय मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या भारताचा डाव अडचणीत सापडला आहे.
आतापर्यंत भारतातर्फे कोहलीने (४४) आणि रहाणे(७९) सर्वाधिक धावा केल्या आहेत. चौथ्या विकेटसाठी कोहली आणि रहाणेमध्ये झालेली ७० धावांची भागीदारी महत्वपुर्ण आणि आतापर्यंतची मोठी भागीदारी आहे.
उपहारापर्यंत अवघी १ विकेट गमवून सुस्थितीत असलेला भारताचा डाव नंतर अडचणीत सापडला. उपहारानंतर खेळ सुरु होताच भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. डेन पीएटने शिखर धवनला (३३) तर अॅबोटने चेतेश्वर पूजाराचा (१४) त्रिफळा उडवला. त्या आधी डेन पीएटने धवनला पायचीत केले. त्याआधी त्याने विजयला (१२) धावांवर आमलाकरवी झेलबाद केले.
भारताला मालिकेत २-० अशी आघाडी मिळाली असल्याने हा सामना जिंकून ३-० अशा मोठ्या विजयासोबतच आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा भारताचा इरादा आहे.
तत्पूर्वी, सामान सुरू होण्यापूर्वी फिरोजशहा कोटला मैदानावर नुकताच निवृत्त झालेला भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा बीसीसीआयतर्फे सत्कार करण्यात आला.