पोर्तुगाल उपउपांत्यपूर्व फेरीत, उरुग्वेवर २-० ने सहज मात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:46 AM2022-11-30T05:46:34+5:302022-11-30T05:47:19+5:30

ब्रुनो फर्नांडिसचे दोन गोल : उरुग्वेवर २-० ने सहज मात

Portugal easily beat Uruguay 2-0 in the quarterfinals | पोर्तुगाल उपउपांत्यपूर्व फेरीत, उरुग्वेवर २-० ने सहज मात

पोर्तुगाल उपउपांत्यपूर्व फेरीत, उरुग्वेवर २-० ने सहज मात

Next

लुसैल : विजयाचा हिरो ठरलेल्या ब्रुनो फर्नांडिसच्या दोन गोलच्या बळावर पोर्तुगालने उरुग्वेचा २-० असा पराभव करीत फिफा विश्वचषक फुटबॉलची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. स्टार स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिला गोल होताच ज्या प्रकारे जल्लोष करताना दिसला त्यावरून हा गोल त्यानेच केला असावा, असा अनेकांचा समज झाला, वास्तविक गोल होण्याआधी ‘अखेरचा टच’ मात्र फर्नांडिसचा होता.

पूर्वार्धात दोन्ही संघ ०-० असे बरोबरीत होते. उत्तरार्धात ५४ व्या मिनिटाला फर्नांडिसचा शॉट डावीकडून रोनाल्डोच्या डोक्यावरून थेट गोलजाळीत जाऊन विसावताच रोनाल्डोने स्वत:चे दोन्ही हात हवेत उंचावून फर्नांडिसला घट्ट मिठी मारली. त्याच वेळी मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर वारंवार रिप्ले दाखविण्यात येत होता. त्यानंतर  रिव्हर्स इंज्युरी टाइममध्ये (९३वे मिनिट) ब्रुनो फर्नांडिसने पेनल्टीद्वारे दुसरा गोल केला.  डी मध्ये जिमेनेझने हाताने चेंडूला स्पर्श केल्यामुळे पोर्तुगालला ही पेनल्टी मिळाली होती. अखेरच्या क्षणी तो पुन्हा एकदा गोल करण्याच्या स्थितीत होता, मात्र चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर जाताच त्याची हॅट्ट्रिक हुकली. त्याआधी रोनाल्डोला ८२ व्या मिनिटाला बाहेर काढण्यात आले.

पोर्तुगालचा दोन सामन्यांत हा दुसरा विजय आहे, सहा गुणांसह एच गटात अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे घानाचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आणि उरुग्वे एक गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. उरुग्वेला आता पुढील फेरी गाठण्यासाठी घानाला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे.

Web Title: Portugal easily beat Uruguay 2-0 in the quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.