भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात मराठमोठ्या दिव्या देशमुखने जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या कोनेरू हम्पीला हरवून विजेतेपद जिंकून इतिहास रचला. बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्याचे अभिनंदन केले आहे. तसेच कोनेरू हम्पी हिचेही त्यांनी कौतुक केले.
"दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश असलेला हा ऐतिहासिक अंतिम सामना ठरला. एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धा २०२५ स्पर्धेत जेतेपद जिंकणाऱ्या दिव्या देशमुखचा अभिमान वाटतोय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन, ज्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. शिवाय, कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा", असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीसह दिव्या देशमुख ही भारताची ८८ वी ग्रँडमास्टर बनली आहे. बुद्धिबळाच्या जगात ग्रँडमास्टर ही पदवी सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. या विजयानंतर दिव्याला बक्षीस म्हणून सुमारे ४३ लाख रुपये मिळतील तर हम्पीला सुमारे ३० लाख रुपये मिळतील.