नवी दिल्ली : माजी कर्णधार व तांत्रिकदृष्ट्या भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला कारकिर्दीमध्ये ग्लेन मॅक ग्रा व मुथय्या मुरलीधरन यांच्याविरुद्ध खेळताना सर्वांत अधिक अडचण भासली. दस्तुरखुद्द द्रविडनेच मंगळवारी याची कबुली दिली. उत्कृष्ट तंत्रामुळे ‘द वॉल’ (भिंत) या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने १६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये १३ हजारपेक्षा अधिक कसोटी धावा आणि वन-डेमध्ये १०,८८९ धावा फटकावल्या आहेत. द्रविडने सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वर चाहत्यांसोबत संवाद साधताना म्हटले आहे, ‘‘मी खेळलेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये ग्लेन मॅक ग्राला खेळणे सर्वांत अडचणीचे भासले. मॅक ग्रा कारकिर्दीत पिकमध्ये असताना मी त्याच्याविरुद्ध खेळलो. तो खरंच महान गोलंदाज होता. तो ज्या वेळी अचूक मारा करीत होता त्या वेळी उजव्या यष्टीचे आकलन करणे कठीण भासत होते.’’भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या द्रविडने आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाबाबत म्हटले आहे, ‘‘तो केवळ उजव्या यष्टीवर चाचणी घेत होता. तो पहिल्या, दुसऱ्या किंवा २५ व्या षटकातही गोलंदाजी करीत आक्रमक असायचा. तो नेहमी प्रतिस्पर्धी फलंदाजांना आव्हान देत असे.’’ फिरकीपटूंचा विचार करता श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुरलीधरनला खेळणे आव्हान होते. द्रविड म्हणाला, ‘‘मी ज्या फिरकीपटूंविरुद्ध खेळलो त्यात मुरलीधरन सर्वोत्तम होता. मुरली चाणाक्ष गोलंदाज होता. त्याच्यात दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता होती. त्याची गोलंदाजी समजणे कठीण होते. त्याच्या कामगिरीत सातत्य होते. गोलंदाजीवर त्याचे नियंत्रण होते.’’ ड्रेसिंग रूममधील सर्वांत संस्मरणीय क्षणाचा उल्लेख करताना द्रविडने पाकिस्तानविरुद्ध २००४ मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेचा उल्लेख केला. द्रविडने भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या अलीकडच्या कालावधीतील फॉर्मची प्रशंसा केली. द्रविड म्हणाला, ‘‘माझ्या मते विजयने गेल्या दोन वर्षांत तंत्रामध्ये बरीच सुधारणा केली आहे. चेंडूची दिशा व टप्पा ओळखण्याची त्याची क्षमता अतुलनीय आहे. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियातील खडतर खेळपट्ट्यांवर आणि येथील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.’’रविचंद्रन आश्विन आणि अजिंक्य रहाणे यांची जोडी क्लोज कॅचिंगमध्ये त्याची व अनिल कुंबळेच्या जोडीच्या तुलनेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
मॅक ग्रा, मुरलीविरुद्ध खेळणे आव्हान होते
By admin | Updated: December 2, 2015 04:03 IST