गॅले : लेगस्पिनर यासीर शाहने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ७६ धावांत घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर पाकने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्यांनी मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली.शाहच्या फिरकीसमोर लंकेचा दुसरा डाव २0६ धावांत आटोपला. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक ७९ धावा केल्या. थिरिमाने याने ४४ व दिनेश चांदीमलने ३८ धावांची खेळी केली. लंकेने अखेरचे पाच फलंदाज ३९ धावांत गमावले.त्यानंतर पाकिस्तानने विजयासाठी आवश्यक असलेले ९0 धावांचे लक्ष्य फक्त ११.२ षटकांत एकही गडी न गमावता ९२ धावा करीत पूर्ण केले. मोहम्मद हाफीज ४६ आणि अहमद शहजाद ४३ धावांवर नाबाद राहिले. पावसामुळे पहिल्या दिवशी खेळपट्टीवर एकही चेंडू टाकला गेला नव्हता. खेळ सुरू झाल्यावर श्रीलंकेने ३00 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकने आघाडीचे पाच फलंदाज ९६ धावांत गमावले; परंतु असद शफिक (१३१) व सर्फराज अहमद (९६) यांच्यामुळे पाकने पहिल्या डावात ४१७ धावा करताना ११७ धावांची आघाडी मिळवली.श्रीलंकेने दिवसाची सुरुवात २ बाद ६३ या धावसंख्येवरून केली आणि उपाहारापर्यंत त्यांनी ४ बाद १४४ धावा केल्या. तथापि, दुसऱ्या सत्रात त्यांनी ६ विकेट गमावल्या.
पाकचा दणदणीत विजय
By admin | Updated: June 22, 2015 01:18 IST