हरारे : दुसराच आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळणारा आॅफस्पिनर बिलाल असीफ याने गोलंदाजीत घेतलेले ५ बळी व नंतर सलामीवीर म्हणून फलंदाजीत केलेल्या उपयुक्त ३८ धावांच्या खेळीच्या बळावर पाकिस्तानने तिसऱ्या वन डे सामन्यात झिम्बाब्वे संघावर ७ गडी आणि तब्बल ९६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. याचबरोबर पाकिस्तानने तीन वन डे सामन्यांची ही मालिका २-१ फरकाने जिंकली.पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. त्यांचा हा निर्णय सार्थकी ठरवताना बिलाल असीफ याने सुरेख गोलंदाजी करून झिम्बाब्वेला ३८.५ षटकांत १६१ धावांत गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. चामू चिभाभा आणि आर. मुतुम्बामी यांनी झिम्बाब्वेला सुरेख सुरुवात करून देताना पहिल्या गड्यासाठी २०.३ षटकांत ८९ धावांची सलामी दिली; परंतु नंतर असीफ बिलाल आणि इमाद वसीम यांच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. चामू चिभाभाने ७६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ व रिचमंड मुतुम्बामी याने ५ चौकार व २ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. इरफानचा चेंडू रिचमंडच्या डोक्यावर आदळलासामन्याच्या १६व्या षटकातील मोहंमद इरफानचा अखेरचा उसळता चेंडू झिम्बाब्वेचा सलामीवीर रिचमंड मुतुम्बामी याच्या डोक्यावर आदळला. इरफानचा हा उसळता चेंडू रिचमंडने सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा अंदाज चुकला व चेंडू त्याच्या डोक्यावर जोरात आदळला. एवढेच नव्हे, तर रिचमंडच्या डोक्यावरील हेल्मेटदेखील हवेत उडाले. चेंडू डोक्यावर आदळला तेव्हा रिचमंड ३४ धावांवर खेळत होता. उपचारांनंतरही रिचमंडने खेळणे पुढे सुरू ठेवताना ६७ धावांची झुंजार खेळी केली.संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे : ३८.५ षटकांत सर्व बाद १६१. (चामू चिभाभा ४८, रिचमंड मुतुम्बामी ६७. बिलाल असीफ ५/२५, इमाद वसीम ३/३६).पाकिस्तान : ३४ षटकांत ३ बाद १६२. (अहमद शहजाद ३२, बिलाल असीफ ३८, शोएब मलिक नाबाद ३४, असद शफीक नाबाद ३८).
पाकिस्तानने वन डे मालिका जिंकली
By admin | Updated: October 6, 2015 01:12 IST