रोहित नाईक, विशाखापट्टणम : आदिवासी समाजातील तरुणांमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे, परंतु योग्य संधी मिळत नसल्याने त्यांना आपले कौशल्य सादर करता येत नाही. यासाठीच आम्ही विशेष प्रयत्न केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंना ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशनचे (आयबीबीएफ) चेअरमन नागेश्वर राव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विशाखापट्टणम येथे सोमवारी रात्री केवळ आदिवासी समाजाच्या खेळाडूंसाठी आयोजित केलेली पहिली राष्ट्रीय ‘हिल, वॅलीज् आणि माऊंटन्स’ (एचव्हीएम) शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. ‘आयबीबीएफ’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये यजमान आंध्र प्रदेशसह, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यातील शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी घेतलेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच, ‘एचव्हीएम’ राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूला प्रमाणपत्र, पदक आणि ३.६ फूट उंचीचा भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. झारखंडच्या एस. के. हुसैन याने यावेळी एकहाती वर्चस्व राखताना ‘एचव्हीएम’ जेतेपद पटकावले.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाविषयी नागेश्वर यांनी सांगितले की, ‘आदिवासी समाजातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आणण्याचे आमचे स्वप्न होते. आजपर्यंत असा प्रयत्न कोणीही केला नाही. या खेळाडूंमध्ये जबरदस्त आत्मविश्वास असून ते कुठेही कमी पडत नाही. परंतु, त्यांना योग्य संधी मिळत नसल्याने मी आणि माझ्या टीमने सुमारे अडीच महिने देशातील विविध भागातील आदिवासी परिसरामध्ये सर्वेक्षण करुन या खेळाडूंचा शोध घेतला. येथे येऊन सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी उंचावला असून भविष्यात नक्कीच यांच्यातील एक राष्ट्रीय विजेता बनेल. तसेच पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिरंगा फडकावेल याचा विश्वास आहे.’नागेश्वर पुढे म्हणाले की, ‘या खेळाडूंना शरीरसौष्ठव खेळासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळत नसल्याने शारिरीक तंदुरुस्ती असूनही त्यांच्या शरीराला योग्य आकार मिळत नाही. त्यांची ही अडचणही आता आम्ही दूर करणार असून प्रत्येकाला योग्य मार्गदर्शनासोबतच योग्य खुराक कसा असावा याचेही ज्ञान देणार आहोत. ‘एचव्हीएम’ स्पर्धा या खेळाडूंसाठी खूप मोठी संधी होती आणि ती त्यांनी अचूकपणे साधली आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला या खेळाडूंमध्ये मोठे बदल झालेले पाहण्यास मिळेल.’यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धा महिला शरीरसौष्ठवपटूंसाठीही लक्षवेधी ठरली. यावेळी महिला विजेत्या खेळाडूला ३.४ फूट उंचीचा भव्य चषक प्रदान करण्यात आला. अशा प्रकारचा चषक महिला खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत लाभत नसल्याने त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता. पुरुष खेळाडूंच्याबरोबरीने पारितोषिक प्रदान करण्यात आल्याने महिला खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.- नागेश्वर राव, चेअरमन - आयबीबीएफ
आदिवासी समाजाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे ध्येय - नागेश्वर राव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 7:56 PM