ढाका : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनचा जामीन न्यायालयाने रविवारी मंजूर केला. त्यामुळे त्याचा विश्वकप स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीबीसी) अध्यक्ष नाजमउल हसन यांनी सांगितले की, ‘रुबेल विश्वकप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाचा सदस्य आहे. बोर्डातर्फे विश्वकप स्पर्धेपर्यंत त्याला पाठिंबा आहे. प्रकरण मजबूत नसल्यामुळे त्याच्या आधारावर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.’ विश्वकप स्पर्धेत रुबेल हुसेनच्या खेळण्याबाबत साशंकता होती. ढाका येथील एका न्यायालयाने गुरुवारी रुबेलचा जामीन अर्ज फेटाळला होता. लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध स्थापित केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने गेल्या महिन्यात रुबेलवर केला होता. २५वर्षीय रुबेल बांगला देशतर्फे २२ कसोटी व ५३ वन-डे आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. (वृत्तसंस्था)
रुबेलचा विश्वकप स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा
By admin | Updated: January 12, 2015 01:43 IST